पाण्यावर तरंगणाऱ्या स्वयंघोषित सिद्धपुरुषाचा भांडाफोड

हिंगोली जिल्ह्यातील धोत्रा येथील हरिभाऊ राठोड यांची पाण्यावर तरंगण्याची चलचित्रफीत विविध समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली होती. तथाकथित सिद्धी प्राप्त असल्यामुळे ते पाण्यावर तरंगत असल्याचा दावा या चलचित्रफीतच्या माध्यमातून करण्यात आला होता. हा दावा थोतांड असल्याचे सिद्ध करण्यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने रविवारी पाण्यावर तरंगण्याचे प्रात्यक्षिक आयोजित केले होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 22 May 2023
  • 10:38 am
पाण्यावर तरंगणाऱ्या स्वयंघोषित सिद्धपुरुषाचा भांडाफोड

पाण्यावर तरंगणाऱ्या स्वयंघोषित सिद्धपुरुषाचा भांडाफोड

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दाखवले पाण्यावर तरंगण्याचे प्रात्यक्षिक

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

हिंगोली जिल्ह्यातील धोत्रा येथील हरिभाऊ राठोड यांची पाण्यावर तरंगण्याची चलचित्रफीत विविध समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली होती. तथाकथित सिद्धी प्राप्त असल्यामुळे ते पाण्यावर तरंगत असल्याचा दावा या चलचित्रफीतच्या माध्यमातून करण्यात आला होता. हा दावा थोतांड असल्याचे सिद्ध करण्यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने  रविवारी  पाण्यावर तरंगण्याचे प्रात्यक्षिक आयोजित केले होते. 

पुण्यातील डेक्कन जिमखाना टिळक जलतरण तलावात अंनिसने स्वयंसेवकांच्या मदतीने तरंगून दाखवले. प्रात्यक्षिकात पुण्यातील जयंत विलायतकर व त्यांचा मुलगा हर्ष विलायतकर यांनी सहभाग घेतला. पाण्यावर तरंगणे हे कौशल्य सिद्धीप्राप्त केल्याने नव्हे तर नियमित त्याप्रकारे पोहण्याच्या सरावाने विकसित करता येते. हे कळावे, हा त्यामागचा हेतू होता. 

अंनिसचे महाराष्ट्र राज्य युवा संघटक पंकज वंजारे म्हणाले, "अंनिस कुठल्याही देवा-धर्माला विरोध करत नाही. संत, महापुरुषांचे विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवणे आणि अंधश्रद्धांचे निर्मूलन करणे, हाच चळवळीचा उद्देश आहे. कोणतीही व्यक्ती चमत्कार करू शकत नाही. चमत्कार सिद्ध करा आणि ३० लाख रुपये मिळवा, हे आव्हान अ. भा. अंनिसद्वारे मागील ४० वर्षांपासून भारतासह जगातील सर्व स्वयंघोषित बाबा बुवा, देवी, मांत्रिक, तांत्रिक यांना देण्यात येत असून आजतागायत हे आव्हान कोणीही लेखी स्वरूपात अधिकृतपणे स्वीकारून सिद्ध करू शकले नाही. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून आजपर्यंत कोणत्याही संताने चमत्कार केला नाही आणि चमत्काराचे समर्थनही केले नाही. याउलट संतांनी चमत्काराला आपल्या साहित्यातून आणि कृतीतून विरोधच केला आहे. जादुटोणाविरोधी कायद्यातील अनुसूची २ नुसार तथाकथित चमत्कारांचा प्रयोग प्रदर्शित करून, त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करणे तसेच अशा तथाकथित चमत्कारांचा प्रचार व प्रसार करून लोकांना फसवणे, ठगवणे आणि त्यांच्यावर दहशत बसविणे, कायद्याने गुन्हा आहे. असे घडत असल्यास पोलिसात तक्रार करण्याचे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यावेळी केले. 

या पत्रकार परिषदेला प्रात्यक्षिक सादर करणारे जयंत विलायतकर यांच्यासह राष्ट्रीय अध्यक्ष मधुकर कांबळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष रवी खानविलकर यांची उपस्थिती होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest