संग्रहित छायाचित्र
पुणे : पुणे शहरात हवा प्रदुषण वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. शहरातील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयानुसार अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. या पथकाने शहरातील विविध बांधकामाच्या साइटवर पाहणी करण्याचा धडाका लावला आहे. या पाहणीत नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी सोमवार (ता. २७) पर्यंत १६० बांधकाम व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात असून तातडीने उपाय योजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पुण्याची हवा प्रदूषित झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात सुमारे ८ ते १० हजार बांधकाम प्रकल्पांचे काम जोरात सुरु आहेत. महापालिकेकडून परवानगी घेताना सुरक्षिततेची काळजी घेण्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्देश आणि मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्यात येणार असल्याचे बांधकाम व्यवसायिक मान्य करतात. मात्र प्रत्यक्षात याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. यांच्या दुर्लक्षामुळे शहरात धुळीचे प्रमाण वाढल्याने हवा प्रदूषित झाली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. त्यामुळे महापालिकेने या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी महापालिकेने कडक धोरण अवलंबिले असून पथकांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जात असून नियम न पाळणाऱ्या बांधकाम व्यवसायिकांना 'तुमचे बांधकाम का थांबविण्यात येऊ नये' असे कारण विचारणारे सूचना पत्र वजा नोटीस दिली जात आहे.
पुणे महापालिकेने बांधकाम विभागाच्या पथकांमार्फेत विविध बांधकामांच्या साइटवर पाहणी केली जात आहे. प्रामुख्याने मध्यवर्ती पेठा, कोरेगाव पार्क, बाणेर बालेवाडी या भागाचा समावेश करण्यात आला आहे. प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता खालवल्याने नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने नियमावली जाहीर करत धुळ निर्माण होऊ नये, हवेत उडू नये यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
या भागात आहे जास्त प्रदूषण...
पुणे शहरातील मध्यवर्ती पेठा, कोरेगाव पार्क, बाणेर बालेवाडी या भागात जास्त प्रदुषण होत आहे.
सोमवार पर्यंत (ता.२७) बांधकाम व्यवसायिकांना झोननुसार नोटीस...
झोन क्रमांक १ मध्ये - २२
झोन क्रमांक २ मध्ये - २७
झोन क्रमांक ३ मध्ये - १८
झोन क्रमांक ४ मध्ये- ४०
झोन क्रमांक ५ मध्ये -१२,
झोन क्रमांक ६ मध्ये - १६,
झोन क्रमांक ७ मध्ये - २५
एकूण- १६०
नोटीस बजाविण्याची कारणे...
प्रामुख्याने बांधकामाच्या साईटवर सर्व बाजूनी २५ फुटापर्यंत पत्रे लावणे, जागेवर राडा रोडा / धूळ बाहेर जाऊ नये यासाठी पाण्याचे स्प्रिंकल सिस्टम यंत्रणा बसविणे, जागेवर ग्रीन नेट बसविणे इत्यादी प्रकारचे उपाययोजना न-केल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे. शहरात विविध ठिकाणी बांधकामांच्या साईटवर पुणे महानगरपालिके तर्फे पाहणी करण्यात येणार आहे. धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनां बद्दल आढावा घेण्यात येऊन सबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
हवा प्रदूषण नियंत्रण पथके...
- सर्व सहाय्यक महापालिका आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली हवा प्रदूषण नियंत्रण पथक स्थापन करण्यात आले आहे.
- पथकामध्ये उप अभियंता (स्थापत्य), आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता / बीट निरीक्षक, एम.एस.एफ जवान यांची नेमणूक करण्यात आली आहे.
- पथकाने मागर्दर्शक तत्वानुसार कामकाज करावयाचे आहे तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावयाचा आहे.
- पथकामार्फेत उघड्यावर कचरा जाळणे तसेच राडा-रोडा टाकणे यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
- पुणे महामेट्रोच्या बांधकामाच्या साईटवर उत्सर्जित होणाऱ्या धुळीवर नियंत्रण आणण्यासाठी महामेट्रो मार्फत विशेष पथक नेमण्यात आले आहे.