चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे गडकरींच्या हस्ते झाले उद्घाटन
पुणेकरांची वाहतूक कोंडीमधून आता सुटका होणार आहे. वाहतूक कोंडीमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, नीलम गोऱ्हे, चंद्रकांत पाटील, रूपाली चाकणकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) द्वारे अंदाजे १ हजार कोटी रुपयांच्या निधीतून उभारलेल्या या प्रकल्पाला राज्य सरकार आणि पुणे महानगरपालिका यांचे योगदान मिळाले आहे. मुख्य महामार्गासह कोथरूड ते मुळशी, सातारा ते मुळशी, मुळशी ते पुणे, मुळशी ते मुंबई, मुळशी ते पाषाण-बावधन, पाषाण ते मुंबई या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल व भुयारी मार्ग तयार करण्यात आला. वाहतूक कोंडी टाळावी म्हणून येथे दोन सेवा रस्ते, आठ रॅम्प, दोन भुयारी मार्ग यासह १७ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले.
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी चांदणी चौकातील जुना पुल पाडून नव्या उड्डाणपुलाच्या कामाचे ऑगस्ट २०१७ मध्ये भूमिपूजन करण्यात आले होते. पण हे काम भूसंपादनामुळे रखडले होते. त्यानंतर प्रत्यक्ष २०१९ मध्ये कामाला सुरूवात झाली. येथील काम आणखी सोयीस्कर होण्यासाठी मागच्या वर्षी चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यात आला होता. भूमिपुजनानंतर तब्बल ६ वर्षांनी हे काम पुर्णत्वास जात असून त्याचे आज उद्घाटन झाले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.