फटाका विक्री स्टॉलचा ऑनलाईन लिलावातून पालिकेला मिळाले ७० लाख
पुणे: महापालिकेने यंदा फटाका विक्री स्टॉलचा ऑनलाईन लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय महापालिकेच्या चांगलाच पथ्यावर पडला असून या ऑनलाईन लिलावातून तब्बल पाच पट उत्पन्न मिळाले असून ७० लाख रुपये मिळाले आहे.
नारायण पेठेतील वर्तक बागेलगतच्या ३५ स्टॉल्सच्या बारा दिवसांच्या भाड्यापोटी ५९ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. तर शहरातील उर्वरीत सुमारे ९७ स्टॉल्सचे ११ लाख लाख असे एकूण ७० लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षी सर्व स्टॉल्सचे मिळून जेमतेम १७ लाख ५७ हजार रुपये उत्पन्न मिळाले होते.
महापालिकडून स्टॉलसाठी ऑफलाईन लिलाव करण्यात येत होता. ऑफलाईनपध्दतीने हा लिलाव होत असल्याने ठराविक व्यवसायिकांची मक्तेदारी तयार झाली होती. तसेच राजकीय पुढाऱ्यांच्या दादागिरीपुढे अनेकांना लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडावे लागत होते. त्यामुळे पालिकेने यंदा पुढाऱ्यांच्या दादागिराला लगाम लावत थेट फटाका स्टॉलसाठी यंदा ऑनलाइन लिलाव पद्धत लागू करण्याचा निर्णय जाहिर केला होता. यामुळे इच्छुकांना समान संधी मिळणार असल्याचे बोलले गेले. त्यानुसार महापालिका भवन येथील मुख्य कार्यालयासोबतच १५ क्षेत्रिय कार्यालयांमध्ये ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्याला व्यवसायिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
वर्तक बाग येथे सर्वाधिक ३५ स्टॉल्स असतात. येथे घाउक विक्रेत्यांची संख्या अधिक असल्याने व्यवसायही चांगला होतो. तसेच उपनगरातही सुमारे १७३ स्टॉल्स असतात. तुलनेने या स्टॉलसाठीचे भाडेदर हे कमी आहेत. यंदा अनेकांच्या विरोधानंतरही महापालिकेने स्टॉल्ससाठी ऑनलाईन सोडत काढली होती. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वर्तक बागेतील ३३ स्टॉल्सचे लिलाव झाले होते. याठिकाणी बोलीची रक्कम ५९ लाखांपर्यंत पोहोचली. सरासरी १ लाख ८० हजार रुपये भाडेदर राहीला. सर्वाधिक बोली ही २ लाख १० हजार एक रुपयांची आहे. तर याठिकाणी एका स्टॉलची बोली सुरू असताना एका व्यावसायीकाने १ लाख ७० हजार रक्कम लिहिताना एक शून्य अधिकचा घातल्याने १७ लाख रुपये बोलीची रक्कम दिसून आल्याने गोंधळ निर्माण झाला होता. अखेर ही चूक दुरूस्त केल्यानंतर फेरलिलाव करण्यात आला. उपनगरातील १७३ पैकी १२७ स्टॉल्सचा लिलाव झाला होता. यातून सुमारे ११ लाख रुपये मिळणार आहेत.
गेल्या वर्षी ऑफलाईन लिलाव पुकारण्यात आले होते. वर्तक बागेतील एका स्टॉलसाठी सर्वाधिक बोली १ लाख १ रुपयांची होती. येथून १४ लाख ५७ हजार रुपये उत्पन्न मिळाले होते. तर शहरातील अन्य स्टॉलचे ३ लाख रुपये उत्पन्न मिळाले होते, अशी माहिती अधिकार्यांनी दिली.
फटाका स्टॉलसाठी यंदा प्रथमच ऑनलाईन लिलाव करण्यात आला. याला पहिल्यांदा विरोध झाला होता. या पध्दतीमुळे पारदर्शकता वाढली. ऑनलाईन लिलावाची पध्दत अत्यंत सोप्या पद्धतीने केल्याने अडचणी आल्या नाहीत. यामुळे व्यावसायिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नव्या व्यावसायीकांनाही स्पर्धेची संधी मिळाली. लिलावात विजेते ठरलेल्या विक्रेत्यांना चलन देण्यासही सुरूवात केली आहे. तसेच अग्शिशामक व अन्य परवानग्या देखिल एका ठिकाणच्या व्यवसायासाठी एकच परवानगी या तत्वावर देण्यात येत असल्याने विक्रेत्यांनीही समाधान व्यक्त केले.
- महेश पाटील, उपायुक्त, मालमत्ता व्यवस्थापन विभाग, पुणे महापालिका