पीएमपीएमएलचा कामचुकार कर्मचाऱ्यांना दणका, ३६ कर्मचाऱ्यांना केले निलंबित, ३ बडतर्फ
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) अध्यक्षांनी कामचुकार कर्मचाऱ्यांना मोठा दणका दिला आहे. कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी १५ डेपोंमधील कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी ३६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मागील रेकॉर्ड खराब असल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता २२ जुलै रोजी गैरहजर राहिलेल्या एकूण १४२ कर्मचाऱ्यांना आरोपपत्र देण्यात आले आहे. याशिवाय, तीन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये ३० कंडक्टर व ६ ड्रायव्हर्सचा समावेश आहे. यामध्ये ७८ कंडक्टर व ६४ ड्रायव्हर्सचा समावेश आहे. याबरोबरच २ ड्रायव्हर व वर्कशॉप विभागाकडील एका कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात येणार आहे. पीएमपीएमएलच्या प्रवाशांना प्रवासीभिमुख सेवा मिळावी, प्रवाशांची गैरसोय होऊ नये, पीएमपीएमएलच्या ताफ्यातील जास्तीत जास्त बसेस मार्गावर संचलनात उपलब्ध व्हाव्यात, कामात कसून करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाणास आळा बसावा, या दृष्टीने कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
प्रवाशांना चोख व उत्तम सेवा मिळावी या उद्देशाने पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी 'प्रवासी दिन', डेपोनिहाय पालक अधिकारी अशा उपक्रमांचा समावेश आहे. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी 'प्रवासी दिन' हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या उपक्रमांतर्गत प्रवाशी त्यांच्या अडी-अडचणी, तक्रारी, सूचना नजीकच्या डेपोमध्ये, पास केंद्रावर किंवा बसस्थानकांवर जाऊन नोंदवू शकतात.
तसेच सर्व डेपोंसाठी डेपोनिहाय पालक अधिकारी नेमलेले असून हे पालक अधिकारी प्रत्येक शनिवारी पहाटे ५ ते सकाळी ८ वाजेपर्यंत डेपोमध्ये समक्ष पाहणी करून प्रवाशांना चांगली सेवा मिळावी यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करतात व त्यानंतर सकाळी ८.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत गर्दीच्या मार्गांवर स्वतः बसमध्ये प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधतात, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.