संग्रहित छायाचित्र
पिंपळे सौदागर येथे ‘यशदा पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉन’ स्पर्धा रविवार (दि. १५) उत्साहात पार पडली. या स्पर्धेत राज्यभरातून धावपटूंनी मॅरेथाॅन स्पर्धेत सहभाग घेतला होता. पहाटेपासून मॅरेथॉन विविध गटातील शर्यतींना सुरुवात झाली.
‘यशदा रिअल्टी ग्रुप’, ‘शत्रुघ्न काटे यूथ फाउंडेशन’ आणि किशान स्पोर्ट्स यांच्या वतीने या स्पर्धेत अडीच हजारांपेक्षा अधिक धावपटूंनी सहभाग घेतला होता. अतिशय उत्कंठापूर्वक वातावरणात २१ कि.मी. अंतराची हाफ मॅरेथॉन सकाळी वेळेवर ५.३० वाजताच सुरू झाली. त्यानंतर अनुक्रमे १० आणि ५ किमी अंतराच्या शर्यती पार पडल्या. या शर्यतीत साड्या परिधान करून महिलांनीही सहभाग नोंदवला. तसेच अंध विद्यार्थीही या ‘हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेत धावले. साहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे, यशदाचे अध्यक्ष वसंत काटे यांनी स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात केली. यावेळी भाजप पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे, उद्योजक संजय भिसे, विजय काटे, सूर्यकांत जाधव, रोहिदास गवारी आदी उपस्थित होते. २१ किमी, १० आणि ५ किमी अंतराच्या शर्यतींना पिंपळे सौदागर येथील रोझ आयकॉन सोसायटीच्या आवारात मोकळ्या मैदानात प्रारंभ झाला. स्पर्धेचा प्रारंभ कुंजीर चौक-शिवार चौक-रक्षक चौक येथून तर परतीचा प्रवास पीके चौक-कोकणे चौक-कासारवाडी नाशिक फाटा ते प्रारंभस्थानी असा होता. स्पर्धेअंती सर्व गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफीज व रोख रक्कम बक्षीस स्वरूपात प्रदान करण्यात आली.
दरवर्षी ‘यशदा पिंपरी चिंचवड हाफ मॅरेथॉन’ स्पर्धा वेगवेगळ्या गटांमध्ये आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत २१, १० आणि ५ किमी अंतराच्या शर्यतींचा असतो. यंदा मॅरेथॉनमध्ये अडीच हजारांपेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धकांना टी-शर्ट, फिनिशर्स मेडल, टायमिंग ई-सर्टिफिकेट, मेडिकल सपोर्ट आदी बाबी पुरवण्यात येतात. स्वच्छ, सुंदर पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी हा उपक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो.
– वसंत काटे, आयोजक, ‘यशदा, पिंपरी-चिंचवड हाफ मॅरेथॉन’
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.