संग्रहित छायाचित्र
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात तीन वर्षांपूर्वीच दाखल होणाऱ्या १६० ई-बस अद्याप मिळालेल्या नाहीत. ठेकेदाराकडून वेळेमध्ये बस मिळत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, त्यावरती कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. दुसरीकडे, पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीच्या अपुऱ्या सेवेमुळे प्रवासी त्रस्त आहेत. त्यामुळे नवीन बस कधी येणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पिंपरी-चिंचवडला जवळपास ५० ई-बसची प्रतीक्षा आहे.
हरित ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देत कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी पीएमपीच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस दाखल करण्याचा निर्णय झाला होता. २०१९ मध्ये पहिल्या टप्प्यात २५ मिडी ई-बस दाखल झाल्या होत्या. सप्टेंबर २०२२ मध्ये मोठ्या ९० ई-बस ताफ्यात दाखल झाल्या. त्यानंतर आतापर्यंत ४९० ई-बस दाखल झाल्या आहेत. दरम्यान, ई-बसमध्ये प्रवाशांचा प्रतिसाद देखील वाढत आहे. मात्र त्यांची वारंवारता कमी असल्याने प्रवासी वाट पाहत ताटकळत थांबतात.
भेकराईनगर, पुणे स्टेशन, बाणेर, निगडी (भक्ती-शक्ती) आणि वाघोली या ई-डेपोला देण्यात आल्या आहेत. त्या ई-डेपोतून बस चालवल्या जात आहेत. पीएमपीच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने नवीन ६५० ई- बस दाखल होणार होत्या. त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांसोबत पीएमपीने करार केले आहेत. सर्व ई-बस साधारण २०२२ पर्यंत पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणे अपेक्षित होते, पण ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे अजूनही १६० ई-बस दाखल झालेल्या नाहीत. पिंपरी- चिंचवडचा विचार केला असता निगडीमध्ये जवळपास ५० दाखल होणार आहेत. त्यामुळे सुरुवातीला हिंजवडी आणि उपनगरात या बसचा वापर केला जाईल. त्यामुळे प्रवाशांच्या तक्रारीही कमी होतील.
पीएमपी ताफ्यामध्ये ईबस दाखल होण्यासाठी आणखी चार महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. म्हणजेच मार्च २०२५ पर्यंत टप्प्याटप्प्याने या बस दाखल होतील. मात्र, याबाबत कोणतीही माहिती आगार प्रमुखांकडे उपलब्ध नाही. याबाबत निगडी विभागाचे आकारप्रमुख अशोक साबळे म्हणाले की, ई बस संचलनबाबत पुणे कार्यालयातून माहिती मिळेल. त्याबाबत इथून काही सांगता येणार नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.