संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड शहरात अमृततुल्य चहा पिताना सर्रासपणे कागदी कप दिला जातोय, चहाचे कागदी कप बनविताना त्यामध्ये बीपीए नामक केमिकलचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपाच्या आतील मायक्रो प्लास्टिक वितळते. चहा घेतल्याने लाखो मायक्रो प्लाॅस्टीक कण पोटात जातात. ज्यामुळे हजारो नागरिकांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला सामोरे लागत आहे. त्यामुळे कागदी कपांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्र गल्लोगल्ली ‘अमृततुल्य’ नावाने चहाची हॉटेल आणि टपऱ्या थाटलेल्या आहेत. या टपऱ्यांमधून चहासाठी कागदी कप हा सर्रास वापरला जातो आहे. कागदी कप या संदर्भात पर्यावरण संवर्धन समितीच्या माध्यमातून महानगरपालिका प्रशासनाकडे मागील अनेक महिन्यांपासून बंदीची मागणी केली जात आहे. महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातलेली आहे, परंतु महापालिकेकडून कागदी कपावर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही.
शहरातील अनेक शासकीय-निमशासकीय कार्यालयात देखील दिवसातून अनेक वेळा चहा मागविला जातो. थंडीच्या दिवसात चहा घेणाऱ्यांची संख्या अधिकच असते. मात्र, कागदाच्या कपात चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. असे असले तरी शहरातील हजारो चहा विक्रेते हे कागदी कपाची विक्री करत आहेत. शहरातील विविध भागात हजारो टपऱ्या चौकाचौकात आहेत. चहा पिणाऱ्यांची संख्या वाढताना दिसून येत आहे. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात कागदी व प्लास्टिक कपात चहात वितरित करण्यावर जिल्हा प्रशासनाने बंदी जाहीर केली आहे, अशी बंदी पिंपरी-चिंचवड शहरात लागू होणार का? असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.
सगळेच जण सकाळपासून संध्याकाळपर्यंत चहा पित असतात. पण, चहा पिताना कागदी कपातून चहा पिऊ नका. कारण, कागदी कपातून गरम चहा पिल्यास त्यातील लाखो मायक्रो प्लास्टिक आपल्या पोटात जाते. त्यामुळे भविष्यात कॅन्सर सारख्या आजाराला सामोरे जावे लागेल. त्यामुळे कागदी कपातून चहा पिऊ नका. त्यामुळे कागदी कपावर शासनाने बंदी घालायला हवी. तसेच थर्माकोल, डिस्पोजल ताट, प्लेटवर बंदी आहे. तरीही त्याचा वापर होत आहे. प्लास्टिक, कागदी कप सर्वत्र वापरतात. ते नॉन बायोडिग्रेडेबल असल्याने प्रदूषण होते. - महेश गायकवाड, पर्यावरण अभ्यासक
लाखो मायक्रोप्लॅस्टिकचे कण पोटात
कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपाच्या आतील मायक्रोप्लास्टिक वितळते आणि तो चहा घेतल्याने लाखो मायक्रो प्लॅस्टिकचे कण पोटात जातात. ज्यामुळे हजारो नागरिकांना कर्करोग या सारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागत लागते. त्यामुळे चहाच्या कागदी कप वापरावर बंदी घालण्याची सूचना सर्व संबंधित विभागप्रमुखांना बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकतेच दिले.