काय सांगता! चिंचवड लिंकरोडचे दोन्ही फूटपाथ घुशींनी पोखरले?

महापालिकेने चिंचवडचा लिंकरोड अर्बन स्ट्रीटनुसार विकसित केला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्यालगत दोन्ही बाजूला फूटपाथदेखील तयार केले होते. मात्र, एका वर्षातच रस्त्यालगतचे फूटपाथ खराब झाल्याने नागरिकांना त्यावरून ये - जा करण्यात अडचणीत येत आहेत.

काय सांगता! चिंचवड लिंकरोडचे दोन्ही फूटपाथ घुशींनी पोखरले?

जनसंवाद सभेत दुरुस्तीची मागणी केल्यावर पालिकेचे अधिकारी दाखवतात घुशींकडे बोट

 विकास शिंदे
महापालिकेने चिंचवडचा लिंकरोड (Chinchwad Link Road) अर्बन स्ट्रीटनुसार विकसित केला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्यालगत दोन्ही बाजूला फूटपाथदेखील तयार केले होते. मात्र, एका वर्षातच रस्त्यालगतचे फूटपाथ खराब झाल्याने नागरिकांना त्यावरून ये - जा करण्यात अडचणीत येत आहेत. या रस्त्यांची देखभाल- दुरुस्ती करणा-या ठेकेदारानेही फूटपाथ दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे.

या संर्दभात ब क्षेत्रीय जनसंवाद सभेत निष्कृट कामांची चौकशी करून रस्त्यालगतचे फूटपाथ दुरुस्त करण्याची मागणी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेने केली. परंतू, या फुटपाथला घूस लागल्याने ते फूटपाथ पोखरले आहेत, असं अजब उत्तर अधिकारी देऊ लागले आहेत,

चिंचवड (Chinchwad) येथील लिंकरोड रस्ता ब क्षेत्रीय कार्यालयाकडून अर्बन स्ट्रीटनुसार विकसित केलेला आहे. करोडो रुपये खर्च करून लिंकरोडवरील एम्पायर इस्टेट पूल ते मोरया हाॅस्पिटलपर्यंत हा रस्ता विकसित केला. त्यात पदपथ, पथदिवे, सायकल ट्रॅक, पार्किंग स्पाॅट, नागरिकांना बसण्याची व्यवस्थादेखील केलेली आहे. मात्र, एका वर्षातच दोन्ही फूटपाथ खराब झाले आहेत.

लिंकरोडलगतच्या दोन्ही बाजूला फूटपाथवर बसवलेले पेव्हिंग ब्लाॅकही जागोजागी खचलेले आहेत. नागरिकांना बसण्यासाठी बनवलेले रॅकदेखील तुटलेले आहेत. अनेक भागात पेव्हिंग खचून खड्डे पडलेले आहेत. रात्रीच्या वेळी फूटपाथवर चालताना ज्येष्ठ नागरिक खड्ड्यात पडल्याच्या घटना घडल्या आहेत. 

लिंकरोड अर्बन स्ट्रीट अंतर्गत सुशोभीकरण करण्यात आले. हे काम ठेकेदार येवले इन्फ्रास्ट्रक्चर यांना दिले होते. त्यांना रस्त्यांची देखभाल दुरुस्ती दोन वर्षासाठी देण्यात आली होती. पण, वर्षातच पदपथ खराब झाला. त्यांची देखभाल-दुरुस्ती संबंधित ठेकेदारांनी करणे अपेक्षित आहे.

याबाबत ब क्षेत्रीय कार्यालयाकडे जनसंवाद सभेत वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेकडून तक्रार करण्यात आली. रस्त्यालगत पदपथ काम निष्कृष्ट दर्जाचे झालेले आहे. त्या कामाची चौकशी करून ठेकेदारासह संबंधित अधिका-यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. महापालिकेच्या सारथी पोर्टलवरही तक्रार करण्यात आली. रस्त्यालगतचे काम न करता त्या तक्रारीची दखल न घेता तक्रार बंद करण्यात आली. तसेच आयुक्त शेखर सिंह यांच्याकडेही तक्रार करण्यात आली.

तरीही संबंधित तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही. जनसंवाद सभेत केलेल्या तक्रारीवर तेथील अधिकारी पदपथ हे घुशींनी पोखरल्याचे सांगत आहे. पण, ते दुरुस्त करण्यास ठेकेदारांना सांगत नाहीत. त्यामुळे रस्त्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे झाल्याने त्या कामाची चौकशी करावी, संबंधित दोषी अधिकारी, ठेकेदारांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही विद्यार्थी परिषदेने केली आहे.

 

लिंकरोडचे पदपथ वर्षात खराब झाले आहेत. त्यांची देखभाल-दुरुस्ती ठेकेदाराने केलेली नाही. जिथे पदपथ खराब झालेत, त्या ठिकाणच्या व्यावसायिक, दुकानदार, रहिवासी नागरिकांकडून सिमेंट, खडी, बारीक वाळू ठेकेदाराच्या माणसांकडून मागितली जात आहे. देखभाल-दुरुस्तीची बिले ठेकेदार महापालिकेकडून घेत आहे, तर संबंधित स्थापत्य विभागाचे अधिकारी हे पदपथ घुशींनी पोखरल्याचे सांगत आहेत. त्यामुळे ठेकेदाराला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे

- नकुल भोईर, प्रदेश उपाध्यक्ष, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest