चऱ्होलीत ‘पाणीसंकट’
पंकज खोले:
पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात वडमुखवाडी, चऱ्होली येथील सोसायटीमध्ये खुद्द महापालिकेत अधिकाऱ्याने पाहणी करून अद्याप पाणी समस्या मिटली नाही. दुसरीकडे, सोसायटीधारकांचा संयमाचा बांध फुटला असून, येथील रहिवाशांनी महापालिका भवनावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. (Water Scarcity in Charholi)
चऱ्होली येथील यशोभूमी सोसायटीत रहिवाशांना पाण्याची गंभीर समस्या भोगावी लागत आहे. सोसायटीला पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पाणी खूप कमी प्रमाणात व दाबाने मिळते. या सोसायटीच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी प्रसाद आल्हाट यांना समक्ष सोसायटीमध्ये घेऊन जाऊन पाण्याच्या प्रश्नाची दाहकता प्रत्यक्ष दाखवली. सोसायटीधारकांनी त्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, त्याबाबत अद्याप कार्यवाही झाली नाही, हे विशेष. (Water Crisis in Charholi)
यशोभूमी सोसायटीमध्ये २०० सदनिका आहेत. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे. दोन दिवसांमध्ये या सोसायटीचा पाण्याचा प्रश्न सोडवतो, असे आश्वासन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. ऐन उन्हाळ्यात तोंडावरती पाण्याअभावी नागरिकांना दिवसेंदिवस ताटकळत राहावे लागत आहे. पाणी प्रश्न सुटला नाही, तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर या सर्व महिला भगिनींना घेऊन जाऊन हंडा मोर्चा काढण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील सोसायटीमध्ये पाणी प्रश्न भेडसावत आहे. नागरिकांच्या असंख्य तक्रारी महापालिकेच्या सारथी व जनसंवाद सभेत येत आहेत. मात्र, त्यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका अपयशी ठरत असल्याचे दिसून येते.
तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा
जोपर्यंत सोसायटीचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही. तोपर्यंत महानगरपालिकेद्वारे या सोसायटीला टँकरने पाणी पुरवण्याचे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे व टँकर चालू केले आहेत. दोन दिवसांनी या सोसायटीचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यात यावा, अशी मागणी या सोसायटीधारकांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने बिल्डरकडून हमीपत्र लिहून घेतलेले आहे. भामा आसखेडचा टप्पा क्रमांक पाच आणि सहा पूर्ण होऊन महानगरपालिका पूर्ण क्षमतेने जोपर्यंत पाणी पुरवत नाही तोपर्यंत विकासकांनीच स्वखर्चाने पाणी पुरवायचे आहे. परंतु, ना बिल्डर पाणी पुरवतो ना महानगरपालिका. बिल्डरवर पाणी न पुरवल्यामुळे कोणती कारवाई केली जात नाही. त्यामुळे संबंधित बिल्डरवर भारतीय दंड संहिता कलम २०० प्रमाणे हमीपत्राचे उल्लंघन केले म्हणून गुन्हे नोंद करावेत.
- संजीवन सांगळे, अध्यक्ष चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.