Pimpri Chinchwad : फायरमनसाठी प्रतीक्षा; शारीरिक चाचणी न झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १५० पदांची भरती प्रक्रिया रखडली

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागासाठी फायरमन रेस्क्युअरच्या (अग्निशमन विमोचक) १५० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी उमेदवारांची लेखी परीक्षा २९ ऑगस्टला झाली. लेखी परीक्षा होऊनही अद्याप शारीरिक चाचणी न झाल्याने भरती प्रक्रिया रखडली आहे.

Pimpri Chinchwad fireman

Pimpri Chinchwad : फायरमनसाठी प्रतीक्षा; शारीरिक चाचणी न झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १५० पदांची भरती प्रक्रिया रखडली

२९ ऑगस्टला झाली होती लेखी परीक्षा, पोलिसांकडून मिळेना वेळ, आता जानेवारीत होणार चाचणी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागासाठी फायरमन रेस्क्युअरच्या (अग्निशमन विमोचक) १५० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी उमेदवारांची लेखी परीक्षा २९ ऑगस्टला झाली. लेखी परीक्षा होऊनही अद्याप शारीरिक चाचणी न झाल्याने भरती प्रक्रिया रखडली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असताना लोकवस्त्या आणि औद्योगिक भागात सातत्याने लहान-मोठ्या आगीच्या घटना घडत आहेत. मात्र, अग्निशमन केंद्रांची संख्या आणि मनुष्यबळ अपुरे असल्याने आगीच्या घटनेवर नियंत्रण आणताना अडचणी येतात. यासाठी अग्निशमन विभागात १५० फायरमनची सरळसेवेने भरती करण्यात येत आहे.

शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या घरात आहे. शहरात झोपडपट्ट्यांबरोबरच दाट लोकवस्तीचा भाग मोठ्या प्रमाणात आहे. टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. मोठ्या संख्येने औद्योगिक, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या सुरू झाल्या आहेत. लोकसंख्येनुसार शहरामध्ये १८ अग्निशमन केंद्रे असणे गरजेचे आहे.

मात्र, सद्यस्थितीत शहरात केवळ आठ अग्निशामक केंद्रे आहेत. लोकसंख्या वाढत असताना अग्निशमन विभागात अपुरे मनुष्यबळ असल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. 

महापालिकेच्या नोकर भरतीसाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने शारीरिक चाचणी घेण्यास नकार दिला आहे. ते केवळ सहकार्य करणार आहेत. पुणे महापालिकेने घेतलेल्या शारीरिक चाचणीचे नियम तपासण्यात येत आहे. त्यानुसार महापालिका स्वत: शारीरिक चाचणी घेणार आहे. जानेवारीत चाचणी घेण्याचे नियोजन आहे.

- विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, महापालिका

अग्निशमन विभागात प्रशासकीय कामकाज मधील अधिकारी, कर्मचारी वगळता सहा लिडिंग फायरमन तर ३० फायरमन कार्यरत आहेत. भविष्यात पिंपरीत मध्यवर्ती केंद्रासह दहा केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे मनुष्यबळाची आणखी गरज आहे.

अग्निशमन विभागात कर्मचारी संख्या वाढविण्याच्या दृष्टीने महापालिकेने तयार केलेल्या आकृतीबंधानुसार १९१ पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यानुसार यामध्ये १५० फायरमन, दहा सहअधिकारी, सहा स्थानक अधिकारी, १५ यंत्रचालक, दहा लिडिंग फायरमन अशा १९१ पदांची सरळ सेवेने भरती करण्याचे अग्निशमन विभागाचे भविष्यात नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील ‘ड’ संवर्गातील अग्निशमन विमोचन, फायरमन ही १५० रिक्त पदे सरळसेवेने भरती करण्यात येत आहे.

अग्निशमन विभागाच्या  फायरमन रेस्क्युअरच्या १५० पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्यासाठी एकूण १ हजार ५०० अर्ज महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागास प्राप्त झाले होते. त्यासाठी ऑनलाईन परीक्षा २९ ऑगस्टला पुणे शहरातील ९ केंद्रांवर घेण्यात आली. त्यात ९०० उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्या उमेदवारांची शारीरिक चाचणी इंद्रायणीनगर, भोसरी येथील संत ज्ञानेश्वर सिथेंटिक ट्रॅक येथे घेण्यात येणार होती.   महापालिकेचे जॉगिंग ट्रॅक खराब झाले असून पोलीस प्रशासनाकडूनदेखील शारीरिक चाचणी घेण्यास वेळ मिळत नाही.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने शारीरिक चाचणी घेण्यास नकार दिला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे शारीरिक चाचणी लांबणीवर पडली आहे. शारीरिक चाचणी कोण घेणार आणि ती कशी घ्यायची याची तपासणी महापालिका प्रशासनाकडून केली जात आहे. परिणामी, उमेदवारांना चाचणी कधी होणार आणि भरतीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता लागली आहे. त्याबाबत प्रशासन विभागाकडे चौकशी केली जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest