विनयकुमार ठरले कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले आयुक्त

शहरातील कायदा सुव्यवस्थेची घडी बसवण्यासाठी प्रमुखाला म्हणजेच पोलीस आयुक्तांना किमान दोन वर्षांचा कालावधी आवश्यक असतो. उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमधील वाढती गुन्हेगारी आणि नागरिकीकरण लक्षात घेता १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वतंत्र आयुक्तालय कार्यान्वित झाले

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sun, 15 Dec 2024
  • 03:37 pm

विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

दोन वर्षांत आयुक्तांनी केले आमूलाग्र बदल, लोकाभिमुख कामकाजावर दिला भर

शहरातील कायदा सुव्यवस्थेची घडी बसवण्यासाठी प्रमुखाला म्हणजेच पोलीस आयुक्तांना किमान दोन वर्षांचा कालावधी आवश्यक असतो. उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमधील वाढती गुन्हेगारी आणि नागरिकीकरण लक्षात घेता १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वतंत्र आयुक्तालय कार्यान्वित झाले. मात्र, गेल्या सहा वर्षांत मागील चार आयुक्तांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नव्हता. परंतु, सध्याचे आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आपला कार्यकाळ १४ डिसेंबरला पूर्ण केला असून, या कालावधीत अनेक लोकहिताची कामे केली आहेत.

आयुक्तालयाची घडी बसवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण अपेक्षित असते. त्यानुसार विनयकुमार चौबे यांनी पोलीस आयुक्तपदाचा कार्यकाळ पूर्ण केला असून, पिंपरी-चिंचवड पोलीस दलाचे प्रमुख म्हणून दोन वर्षांचा कालावधी पूर्ण करणारे ते पहिले आयुक्त ठरले आहेत.

आयुक्त चौबे यांनी जागा, मनुष्यबळ, वाहने उपलब्ध करून घेत आयुक्तालयाची घडी बसवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. उद्योगनगरी, कामगारनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील तसेच औद्योगिक परिसरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलीस दलाची विभागणी करून स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले.

सुरुवातीच्या काही वर्षांत पुरेसे मनुष्यबळ, वाहने, जागा, इमारत यासह नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती, विविध पथके आदींची उपलब्धता होऊन पोलीस आयुक्तालयातील कामकाजाची घडी बसवणे आवश्यक होते. त्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्तांनी पूर्णपणे प्रयत्न केले. मात्र, त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची मूदतपूर्व बदली झाली.

आयुक्तालयातील अडचणी, समस्या समजून घेऊन त्याबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करीत असतानाच चारही आयुक्तांच्या बदल्या झाल्या. मात्र, अपर पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी असलेले विनयकुमार चौबे हे दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे पिंपरी-चिंचवडचे पहिले पोलीस आयुक्त ठरले आहेत. 

मनुष्यबळ, साधनसामग्री, नवीन पोलीस ठाणे

पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले त्यावेळी केवळ तीन पोलीस उपायुक्त पदे मंजूर होती. आयुक्त चौबे यांनी एक अपर आयुक्त आणि दोन उपायुक्तांची तर साहाय्यक आयुक्तांची चार पदे मंजूर करून घेतली. संत तुकारामनगर, दापोडी, काळेवाडी, बावधन या चार पोलीस ठाण्यांची निर्मिती केली. त्यासाठी ३९० पदे मंजूर करून घेतली. अमली पदार्थ शोध व गुन्हे शोध श्वानपथक मंजूर करून १० पदे मंजूर करून घेतली. यासह नवीन १०१ जीप, १० बस, एक ट्रक, एक टॅंकर, तीन टेम्पो ट्रॅव्हलर व २९ दुचाकी मिळवल्या आहेत.

आयुक्तालय, मुख्यालय, पोलीस ठाण्यांसाठी जागा

पोलीस आयुक्त चौबे यांनी आयुक्तालयासाठी चिखली येथे ३.३९ हेक्टर जागा शासनाकडून मिळवली. तेथे आयुक्तालय उभारण्यासाठी १८०.६२ कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासाठी व परिमंडळ दोन उपायुक्तांच्या कार्यालयासाठी वाकड येथील कस्पटे वस्तीत पीएमआरडीएकडून १५ एकर जागा तसेच शासनाकडून २४९ कोटींचा निधी मंजूर करून घेतला. यासह पोलीस मुख्यालयासाठी ताथवडे येथे ५० एकर जागा, चिखली पोलीस ठाणे, परिमंडळ तीन उपायुक्त कार्यालयासाठी जागा, यासह साहाय्यक आयुक्त व पोलीस ठाणे, चौक्यांसाठीही जागा मिळवल्या. देहूरोड येथे बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिसांसाठी विश्रामगृह मंजूर केले.

आयुक्तालयाची पुनर्रचना

पोलीस आयुक्त चौबे यांनी आयुक्तालयाची पुनर्रचना केली. यात परिमंडळ तीनची निर्मिती करून नवीन विभाग कार्यान्वित केला. नवीन सायबर पोलीस ठाणे मंजूर करून घेतले. बाॅम्बशोधक व नाशक पथकाची निर्मिती केली. पोलीस आयुक्तालय स्तरावर सोशल मीडिया लॅब कार्यान्वित केली. पोलिसांसाठी रुग्णालय सुरू केले आहे.

गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारांना दणका दिला. यात मोकांतर्गत ९८ टोळ्यांमधील ५९२ संशयितांना अटक केली. ३९४ अग्निशस्त्रे व १६०३ धारदार शस्त्रे जप्त केली. ५२७ संशयितांना तडीपार करून ४६ संशयितांवर स्थानबद्धतेची कारवाई केली.

वाहतूक कोंडी सोडवण्यास प्राधान्य

बेशिस्त वाहतुकीवर आळा बसविण्यासाठी टोनिंग व्हॅन प्रोजेक्ट राबवण्यात आला. यासाठी स्वतंत्र साडेचारशे अधिक मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले. यापूर्वीपर्यंत वाहतूक विभागासाठी स्वतंत्र उपायुक्त नव्हते. चौबे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर वाहतूक विभागासाठी एक उपायुक्त व दोन साहाय्यक आयुक्तांची  नेमणूक केली. शाळांमध्ये, महाविद्यालयात, कंपन्यांमध्ये वाहतुकीबाबत समुपदेशन करण्यात येते.

शहरासह राज्याच्या भावनेचा आणि अस्मितेचा महत्त्वाचा मुद्दा असलेली आळंदी आणि देहूची पालखी वारीबाबत विशेष नियोजन करण्यात आले आहे. अन्य महापुरुषांच्या जयंती आणि अन्य कार्यक्रमांनी यावेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही उपक्रम हाती घेण्यात आले होते. शासनाकडून शहरांमध्ये ५००० सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेण्यात आले असून, त्याचे कंट्रोलिंग सेंटर निगडी येथे उभारण्यात आले आहे. त्यामुळे कुठे वाहतूक कोंडी झाल्यास कॅमेऱ्यामध्ये पाहून तत्काळ त्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येत आहे.

नागरिकांशी संवादावर भर दिला. व्हिजिबल पोलिसिंग, दिशा उपक्रम, यासह पोलिसांसाठी विविध उपक्रम राबवले. त्यामुळे नागरिकांनी तसेच आयुक्तालयातील अधिकारी व अंमलदार यांच्यात संवाद घडण्यास मदत झाली. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले. यातूनच पोलीस आयुक्तालयाची घडी बसण्यास मदत होत आहे.

 

 विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड  

आत्तापर्यंतचे पोलीस आयुक्त नेमणूक कालावधी

आर. के. पद्मनाभन १५ ऑगस्ट २०१८ १० महिने २७ दिवस

संदीप बिष्णोई ११ जुलै २०१९ १४ महिने २२ दिवस

कृष्ण प्रकाश २ सप्टेंबर २०२० १८ महिने १७ दिवस

अंकुश शिंदे १८ एप्रिल २०२२ ७ महिने २६ दिवस

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest