'पीएमपीएमएल'चा यातनादायी प्रवास!

ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना बससाठी तासनतास चटके खात ताटकळत उभे राहावे लागत असून, उपनगरातील अनेक ठिकाणी अपुरे थांबे, शेडभावी कुठे झाडाचा तर, कुठे दुकानाच्या शेडचा आसरा घ्यावा लागत आहे.

'पीएमपीएमएल'चा यातनादायी प्रवास!

थांबे आहेत तर शेड नाही, जेथे शेड आहे तेथे छत नाही, अनेक ठिकाणी आसनव्यवस्था मोडकळीस

ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना बससाठी तासनतास चटके खात ताटकळत उभे राहावे लागत असून, उपनगरातील अनेक ठिकाणी अपुरे थांबे, शेडभावी कुठे झाडाचा तर, कुठे दुकानाच्या शेडचा आसरा घ्यावा लागत आहे. परिणामी, खासगी प्रवासी आणि अवैध वाहतूक फोफावू लागली आहे. अपुरी जागा, थांब्यांना शेड नसणे, तुटलेली बाके त्याचप्रमाणे बस थांबा परिसरातील अस्वच्छता या सर्व कारणामुळे पीएमपीएमएलचा (PMPML) प्रवास नको, अशी भावना प्रवासी व्यक्त करीत आहेत. 

उन्हाचा पारा हळूहळू वाढत आहे. परिणामी, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झळा बसत असल्याने नागरिकांना क्षणभर थांबू नये असे वाटत असते. मात्र, बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाईलाजास्तव बससाठी वाट बघत उन्हातच थांबावे लागते. ‘सिविक मिरर’च्य प्रतिनिधीने प्रामुख्याने भोसरी, काळेवाडी, केएसबी चौक, थेरगाव, चिंचवडगाव आणि निगडी या परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात काही ठिकाणी बस थांबे सुस्थितीत आहेत. मात्र अनेक ठिकाणी बस थांब्यांची विविध कारणांनी दुरवस्था झाली आहे. अपुरी आसन व्यवस्था, रस्त्यापासून आत असलेली बस स्थानके आणि परिसराची अस्वच्छता याला सामान्य प्रवासी वैतागलेले असल्याचे आढळले.  (PMPML Bus Stop News)

भोसरी बीआरटी डेपोनजीक असलेल्या मार्गावर शेड नसल्याने प्रवासी रस्त्यावरच उभे राहतात. त्यामुळे त्यांना तेथून जवळ असलेल्या भिंतीचा आसरा घ्यावा लागतो. मात्र, बस थांब्यावर आल्यानंतर त्यांना पळत जाऊन बस पकडावी लागते. तसेच, अनेक प्रवासी पदपथावरच बसची वाट पाहत थांबतात. 

दुसरीकडे, बस थांब्यातील आसन व्यवस्था अपुरी आहे. काही ठिकाणची आसन व्यवस्था मोडकळीस आलेली आहे तर, काही तुटलेली आहे. पर्यायाने नागरिकांना थांब्यावर उभेच राहावे लागते. त्यात महिलांना जागाच नसल्याने त्या थांब्याजवळच्या शेडचा वापर करतात. रस्त्यावर थांबून वाहनाच्या गरम धुराच्या झळ्यातून बसची प्रतीक्षा करावी लागते. अनेक ठिकाणी बाकावर बसल्याने प्रवाशांचे कपडे अडकून फाटल्याच्या घटना घडल्या आहेत.

त्यातच बसमध्ये प्रवेश केल्यानंतर बसची मोडकळीस आलेली स्थिती पाहता, ती मध्येच नादुरुस्त होण्याची भीती प्रवाशांना वाटते. बसमध्ये अनेक ठिकाणच्या खिडक्या नादुरुस्त आहेत. त्यामुळे आत वारे येत नाही. परिणामी, बसच्या बाहेर व आत दोन्ही ठिकाणी उकाड्यातून प्रवास करावा लागतो. 

शहरात बीआरटी मार्गामुळे इतर मार्गावरील बसथाब्याची संख्या कमी आहे. मात्र, बीआरटी मार्गाबरोबरच सेवा रस्त्यावरदेखील काही बस थांबे तसेच ठेवण्यात आलेले आहेत. काही प्रवाशांनी व नागरिकांनी मागणी केल्यानुसार त्या ठिकाणी बस थांबे देण्यात आलेले आहेत. याबाबत पीएमपीएमएलचे जनसंपर्क अधिकारी सतीश गाटे आणि जाहिरात विभागाचे दत्तात्रय झेंडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही

एसी बसची मागणी वाढली

पीएमपीएमएलच्या ताफ्यात एसी बसदेखील आहेत. उन्हाळ्यात या बसला मागणी वाढली आहे. एरवी ४० च्या आसपास बसणाऱ्या प्रवाशांची संख्या ५५ ते ६० पर्यंत गेली आहे. त्याचप्रमाणे फेऱ्यासुद्धा वाढवल्या आहेत. वाहतूक कोंडी आणि बसचे चार्जिंग लक्षात घेता, फेऱ्या वाढवण्यास मर्यादा येत आहे. मात्र एसी बसची मागणी या काळात वाढत असल्याचे दिसून आले.

रस्त्याच्या मध्येच रिक्षाचालकांचे बस्तान

भोसरी येथील डेपो परिसरास वैध वाहतुकीचा विळखा पडला आहे. रस्त्याच्या मधोमधच रिक्षाचालकांनी आपले बस्तान बसवले आहे. काही मोटारीच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक होत असल्याचे दिसून आले. उन्हाच्या झळामुळे अनेक प्रवासी सार्वजनिक बसची वाट पाहण्याऐवजी खासगी वाहनाचा मार्ग धरतात. 

मार्ग नसलेल्या ठिकाणी थांबे

पीएमपीएमएलचे विविध ठिकाणी मार्ग आहेत. शहराचा विचार केल्यास जवळपास दिवसाकाठी साडेसहाशे ते पाचशे बसेस ये-जा करतात. मात्र, मार्ग नसलेल्या, बंद पडलेल्या मार्गावर अनेक ठिकाणी बसथांबे दिसून आले. परिणामी त्याचा वापर व्यसनाधीन लोकांकडून होत आहे.  शाहूनगर आणि चिंचवड स्टेशन येथे जादा बस थांबे देण्यात आलेले आहेत. विविध वार्डातदेखील महापालिकेने कोट्यावधी खर्च करून बस थांबे उभारले आहेत. मात्र त्याचा वापर क्वचितच होताना दिसतो.

आळंदी येथे जाण्यासाठी भोसरी थांब्यावर आलो होतो. या ठिकाणी नेमकी माहिती नसल्याने प्रवाशांची धावपळ उडते. काही प्रवाशांना उन्हात उभे राहावे लागते. 

- वाल्मिकी तुमकर, राजगुरुनगर 

पुणे व पिंपरी चिंचवड दोन्ही महापालिकेचे कोट्यावधीची बजेट आहे. मात्र सार्वजनिक वाहतूक सुविधेसाठी ठोस उपाययोजना होताना दिसून येत नाही. गेल्या अनेक वर्षापासून थांब्यांची ओरड प्रवासी करतात. दुसरीकडे  प्रशासनाकडून केवळ ठेकेदार पोसणे याकडे लक्ष असते. त्यांना प्रवाशांशी काही घेणे-देणे नाही.

- संजय शितोळे, पुणे प्रवासी मंच

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest