संग्रहित छायाचित्र
गौरी- गणपतीच्या सणात आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. तो अगदी दीड ते दोन महिने उशिरापर्यंत सुरू होता. उशिरा आलेल्या आणि निम्म्या स्वरूपातील शिधावाटपाची नामुष्की दुकानदारांवर आली होती. आचारसंहिता लागू झाल्याने हे शिधावाटप थांबले आहे. त्यातच आता दिवाळीत मिळणारा आनंदाच्या शिधा वाटप होऊ शकणार नाही. निवडणुकीच्या काळामध्ये तो प्राप्त न झाल्याने पुढे लाभार्थ्यांना देता येणार नाही.
राज्य सरकारच्या वतीने सामान्य नागरिकांना,शिधापत्रिका धारकांना अत्यावश्यक साहित्य किरकोळ दराने वाटप करण्याचे धोरण अवलंबले होते. सरकारने सण-उत्सवाच्या काळात सामान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचे निर्णय घेतले. गौरी- गणपतीच्या उत्सवातही तसाच निर्णय झाला होता. मात्र, अनेक जिल्ह्यांना तो वेळेत उपलब्ध झाला नाही आणि आता निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने त्याचे वाटप थांबले आहे. एकत्रितपणे ज्या पिशवीतून तो शिधा दिला जातो, त्यावर सत्ताधाऱ्यांची छायाचित्रे असल्याने अडचण निर्माण झाली होती, पण प्रशासनाने पिशवीविना शिधावाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील लाभार्थ्यांना फोटो नसलेल्या पिशव्यांमधून शिधावाटपाचे काम सुरू होते. रास्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना सणाच्या काळात शिधा वाटप केला जात होता. शहरात आनंदाचा शिधा उशिरा उपलब्ध झाल्याने गणेशोत्सव काळात त्याचे पूर्ण वाटप होऊ शकले नाही. त्यातच एन निवडणुकीच्या तोंडावर तसेच, आचारसंहितेमध्ये त्याचे वाटप करण्याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे आता उरलेला शिधा आपल्याला मिळणार नाही, असा समज नागरिकांमध्ये निर्माण झाला. मात्र तो पिशवीवीना वाटप करण्यात आला. त्यानंतर आता येणाऱ्या दिवाळीमध्ये हा शिधा देता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
गौरी गणपतीसाठी देण्यात येणारा शिधेचे वाटप शंभर टक्के पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता आचारसंहितेमुळे वाटप होणार नाही.
- प्रशांत खताळ, सहाय्यक अन्नधान्य अधिकारी, पुणे