संग्रहित छायाचित्र
महापालिका हद्दीतील १८ मीटरपेक्षा जास्त रुंदी असलेल्या शहरातील रस्त्यांची साफ-सफाई यांत्रिकी पध्दतीने करण्यात येते. मात्र, रस्ते साफसफाई करताना किलोमीटर वाढवण्यासाठी रस्ता साफ न करताच रोडस्वीपर पळवणाऱ्या ठेकेदारांना आता चाप बसणार आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने जीपीएसद्वारे रोडस्वीपरवर ऑनलाइन वाॅच ठेवण्यास सुरुवात केली असून साॅफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले आहेत. महापालिकेमार्फत शहरातील १८ मीटर रुंदीचे रस्ते यांत्रिकी पध्दतीने साफसफाईचे कामकाज केले जाते.
शहराचे दक्षिण आणि उत्तर असे दोन भाग केले आहेत. फेब्रुवारी २०२४ पासून यांत्रिकी पध्दतीने चार पॅकेजमध्ये काम सुरू असून यासाठी चार एजन्सी कार्यरत आहेत. प्रत्येक पॅकेजमध्ये २ हेवी रोडस्वीपर, २ मीडियम रोडस्वीपर, ४ गॉब्लर लिटर पिकर, २ हुक लोडर, १ पाण्याचा टँकर आदी वाहनांचा समावेश आहे.
प्रत्येक रोडस्वीपरद्वारे दररोज ४० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची साफसफाई करणे आवश्यक आहे. १८ मीटर व त्यापेक्षा जास्त रुंदीचे रस्ते आठवड्यातून ३ वेळा, बीआरटी आणि महामार्ग तेथील फुटपाथ व सर्व्हिस रोडची बाजू यांची आठवड्यातून ३ वेळा, मुख्य मार्गावरील मधला रस्ता यांची आठवड्यातून वेळा साफसफाई करणे आवश्यक आहे. रस्ते साफसफाई न करता ठेकेदार रोड स्वीपर किलोमीटर वाढवण्यासाठी पळवत पालिकेकडून पैसे उकळत असल्याचे अडीच महिन्यापूर्वी उघडकीस आले होते. त्यानंतर महापालिकेने ॲन्थोनी वेस्ट हॅण्डलिंग सेल लिमिटेडला पाच, लायन सर्व्हिसेला चार, रिल वेस्ट मॅनेजमेंट एलएलपीला तीन तर भूमिका ट्रान्स्पोर्टला दोन नोटीस बजावल्या आहेत, तर लायन सर्व्हिसेसला ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला होता.
दरम्यान, यांत्रिकी पध्दतीने रस्ते साफसफाई करताना ठेकेदार रोडस्वीपरच्या ब्रशचा वापर करत नव्हते. त्यामुळे रोडस्वीपरच्या ब्रशचा वापर होतो की नाही? याची पाहणी करण्यासाठी महापालिकेच्या साॅफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आला आहे. याचीही माहिती महापालिकेत बसून होणार आहे.
यांत्रिकी पध्दतीने रस्ते साफसफाई करताना ठेकेदार रोडस्वीपरच्या ब्रशचा वापर न करता किलोमीटर वाढवण्यासाठी तसाच पळवत होते. ही बाब आरोग्य विभागाच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे रोडस्वीपरवर आॅनलाइन माॅनिटरिंग सुरू केले असून त्यानुसार पालिकेच्या साॅफ्टवेअरमध्ये तसा बदल केला आहे.
- अजिंक्य येळे, साहाय्यक आयुक्त, आरोग्य विभाग.