संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागात मानधनावर ११ महिन्यांसाठी माळी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यांची मुदत संपली आहे. निविदा प्रक्रियेस विलंब होत असल्याने त्यांना ६ महिने कालावधीसाठी नेमण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
महापालिकेने वृक्षारोपण केलेल्या वृक्षांची उन्हाळ्यात देखभाल करण्यासाठी माळी कर्मचार्यांची आवश्यकता आहे. तसेच, उद्यान विभागामार्फत देखभाल केली जाणारी उद्याने, रस्त्यावरील दुभाजक, वाहतूक बेटे, पुतळे तसेच, इतर ठिकाणी देखभालीसाठी माळी कर्मचार्यांची आवश्यकता आहे.
उद्यान विभागाकडे केवळ १० माळी कर्मचारी आहेत. त्यासाठी उद्यान विभागाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मानधनावर माळी कर्मचारी नेमण्याचा प्रस्ताव उद्यान विभागाने दिला आहे.
त्यानुसार गणेश खिंड, औंध येथील राहुरी कृषी विद्यापीठ माळी प्रशिक्षण केंद्र आणि बारामती कृषी विद्यापीठाकडे १०० प्रशिक्षणार्थी माळी कर्मचार्यांची मागणी करण्यात आली होती. एकूण ४३ माळी कर्मचारी १९ एप्रिल २०२३ पासून रूजू झाले. त्यापैकी ३७ कर्मचार्यांचा ११ महिन्यांचा कालावधी १८ मार्च २०२४ ला संपला आहे.
त्यांना सहा महिने मुदतवाढ देण्यात आली. त्यापैकी ३२ कर्मचारी रुजू झाले. त्यांची मुदतवाढ २८ ऑक्टोबर २०२४ ला संपली. तसेच, उद्यान विभागाकडून ४७ कर्मचारी नेमण्यात आले होते. त्याची मुदत ८ सप्टेंबर २०२४ ला संपली आहे. या कर्मचार्यांना पुन्हा ६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. हे कर्मचारी रुजू झाले आहेत. या प्रस्तावास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.