अचानक बंद पडले निघोजे पाणी उपसा केंद्राचे पंप

आंद्रा धरणातून पिंपरी-चिंचवड शहरासाठी १०० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणीपुरवठा करणे अपेक्षित आहे. पण, सध्यस्थितीत धरणात पाणीसाठा कमी असून शहराला दररोज ४० ते ५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी पुरवण्यासाठी इंद्रायणीच्या निघोजे बंधाऱ्यातून उपसा सुरू होता.

Nighoje Water Pumping Station

संग्रहित छायाचित्र

इंद्रायणीच्या निघोजे बंधाऱ्यात उपलब्ध नव्हते पाणी, भोसरी, चिखली, मोशीसह समाविष्ट गावांचा पाणी पुरवठा तब्बल तीन आठवडे विस्कळीत

विकास शिंदे
आंद्रा धरणातून पिंपरी-चिंचवड शहरासाठी १०० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणीपुरवठा करणे अपेक्षित आहे. पण, सध्यस्थितीत धरणात पाणीसाठा कमी असून शहराला दररोज ४० ते ५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी पुरवण्यासाठी इंद्रायणीच्या निघोजे बंधाऱ्यातून उपसा सुरू होता. पण, निघोजे उपसा केंद्रातील पंप अचानक बंद झाले. त्यामुळे महापालिका हद्दीतील भोसरी, चिखली, मोशीसह समाविष्ट गावांचा पाणी पुरवठा तब्बल तीन आठवडे विस्कळीत झाला होता. त्यामुळे आंद्रा धरणातून पाणीपुरवठा पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी पाणी पुरवठा विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराला आंद्रा धरणातून १०० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याचा कोटा मंजूर आहे. पालिकेकडून आंद्रा धरणातून पाणी उचलण्यासाठी इंद्रायणी नदीच्या निघोजे बंधा-यातून पाणी उपसा केंद्राचे पंप कार्यान्वित केलेले आहेत. निघोजे बंधाऱ्यातून पाणी उपसा करून ते चिखलीतील जलशुध्दीकरण केंद्रात प्रक्रिया करून त्यानंतर मोशी, चिखली, भोसरी, दिघी, चऱ्होली भागाला पाणी पुरवठा केला जात आहे. महापालिकेकडून सुरुवातीला ५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आंद्रा धरणातून उचलून देण्यात येत होते . सध्यस्थितीत उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने आंद्रा धरणातील पाणीसाठा देखील कमी झाला आहे. त्यामुळे महापालिकेने आंद्रा धरणातून दररोज ४० ते ५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी प्रतिदिन इंद्रायणी नदीतून घेण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून शहरातील समाविष्ट भागाला पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जाणाऱ्या शहरवासीयांना काहीअंशी दिलासा मिळाला होता.

शहराची लोकसंख्या वाढत असताना पाण्याची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे. मावळातील पवना धरणातून ५१० तर एमआयडीसीकडून २० असे ५३० एमएलडी पाणी वितरित केला जात होते. मात्र, शहराच्या विविध भागात अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी सुरू होत्या. त्यामुळे मावळातील आंद्रातून १०० एमएलडी, तर खेडच्या भामा-आसखेड धरणातून १६७ असा २६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी कोटा पाटबंधारे विभागाने मंजूर आहे. आंद्रा आणि भामा-आसखेड धरणातील पाण्यावरील प्रक्रियेसाठी चिखलीत ३०० दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. या जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण होऊन दीड वर्ष झाले आहे. महापालिकेने सुरुवातीला ५० एमएलडी, त्यानंतर ७५ एमएलडी अशुद्ध जलउपसा करण्यास सुरुवात केली. इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्यातून पंपाद्वारे पाणी उचलून चिखली जलशुद्धीकरण केंद्रात आणले जात होते. तेथे प्रक्रिया झाल्यानंतर जलवाहिन्यांद्वारे पाणी शहराला वितरित केले जात आहे.

चिखली जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, दिघी, बोपखेल या गावांसह भोसरीचा काही भाग आणि प्राधिकरण सेक्टर १ ते १६ भागात पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत या भागात पुरविले जाणारे पाणी शहराच्या अन्य भागात वितरित केले गेले होते. दरम्यान, सध्यस्थितीत आंद्रा धरणातील पाणी साठा कमी होऊ लागला आहे. पाटबंधारे विभागाकडून इंद्रायणी नदीपात्रात पाणी पुरवठा कमी केला आहे. पण, इंद्रायणी नदीच्या निघोजे बंधा-यातून महापालिका दररोज ४० ते ५० एमएलडी पाणी उपसा करत होते. त्या बंधा-यातील पाण्याची लेवल हळूहळू कमी झाली. त्यानंतर निघोजे येथील उपसा केंद्रातील पंप अचानक बंद झाले. त्यामुळे तीन आठवडे झाले पाणीपुरवठा कमी दाबाने व विस्कळीत झाला आहे.

पाटबंधारे विभागाकडून देखील निघोजे बंधा-यात पाणी सोडले जात नव्हते. महापालिकेचे पाणी केंद्रातील पंप बंद पडल्यानंतर पाटबंधारे विभागातील अधिकारी अचानक जागे झाले. त्यानंतर धरणातून इंद्रायणी नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे समाविष्ठ गावातील पाणी पुरवठ्याची विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसवण्यास महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

पाटबंधारे विभागासोबत आज आयुक्तांची बैठक

महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी पुणे पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्यासमवेत सोमवारी (१८ मार्च) आयुक्त दालनात बैठक आयोजित केली आहे. या प्रसंगी महापालिका पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंतादेखील उपस्थितीत राहणार आहेत. या बैठकीत आंद्रा धरणातील १०० एमएलडी, भामा आसखेड १६७ एमएलडी प्रलंबित कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. दोन्ही योजनेतील पाईप लाईन कामाची स्थिती, शेतक-यांची भूसंपादन प्रक्रिया, उपसा केंद्राच्या जागेची स्थिती यासह विविध प्रलंबित प्रश्नावर चर्चा करून तोडगा काढण्यात येणार आहे.

भामा-आसखेडच्या पाण्यासाठी दोन वर्षांची प्रतीक्षा

भामा-आसखेड धरणातून मंजूर १६७ दशलक्ष लिटर पाणी येण्यास आणखी किमान दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. जलवाहिनीद्वारे पाणी आणले जाणार आहे. मात्र, धरणग्रस्त शेतकरी आणि जलवाहिनी टाकली जाणाऱ्या इंदोरी परिसरातील शेतकऱ्यांनी जमिनीच्या मोबदल्यात अन्य मागण्या मान्य केल्याशिवाय काम होऊ न देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे काम संथ गतीने सुरू आहे.

आंद्रा धरणात पाण्याची पातळी चांगली होती. त्यावेळेला इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधा-यातून दररोज ७५ दशलक्ष लिटर (एमएलडी) अशुध्द जलउपसा करण्यात येत होता. पण, सध्यस्थितीत आंद्रा धरणातील पाणी साठा पाहता सध्या प्रतिदिन ४० ते ५० दशलक्ष लिटर (एमएलडी) अशुद्ध जलउपसा करून चिखली जलशुध्दीकरण केंद्रात प्रक्रिया करत पाणी वितरण सुरू आहे. मागील काही दिवसात बंधा-यातील पाणी साठा हळूहळू कमी झाला होता. त्यामुळे काही दिवस पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे आता टप्प्याटप्प्याने त्यात वाढ केली जात आहे. जुन्या व नवीन जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा सुरळीत केला जात आहे.

- श्रीकांत सवणे, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest