तीन लाखांवरील थकबाकीदारांच्या मालमत्तांचा होणार लिलाव

पिंपरी-चिंचवड शहरातील तीन लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या थकबाकीदारांची मालमत्ता सील करण्याची कारवाई लवकरच सुरू केली जाणार आहे. तसेच, थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली असून, त्या मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे,

संग्रहित छायाचित्र

साहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांची माहिती, कर संकलन विभागाचा निर्णय

पिंपरी-चिंचवड शहरातील तीन लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या थकबाकीदारांची मालमत्ता सील करण्याची कारवाई लवकरच सुरू केली जाणार आहे. तसेच, थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली असून, त्या मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे, असे महापालिकेच्या कर संकलन विभागाचे साहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी शुक्रवारी (दि.२९) सांगितले.

विधानसभा निवडणुकीसाठी कर संकलन विभागाचे बहुतांश अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे या विभागाचे कामकाज जवळजवळ ठप्प झाले होते. परिणामी, वसुली मंदावली होती. निवडणुकीचे कामकाज संपल्याने सर्व अधिकारी व कर्मचारी पुन्हा रूजू झाले आहेत. मंडल अधिकार्‍यांची बैठक घेऊन वसुली मोहीम तीव्र करण्याचे आदेश साहाय्यक आयुक्त शिंदे यांनी दिले आहेत.

शहरातील पाच लाखांपेक्षा अधिक रुपये थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांची संख्या १ लाख ३२ इतकी आहे. त्यांच्याकडे तब्बल १४० कोटींची थकबाकी आहे. त्या थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आठवडाभरात त्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई तीव्र केली जाणार आहे.

तसेच, तीन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांचीही यादी तयार करण्यात आली आहे. असे थकबाकीदार एकूण १ हजार ६३२ आहेत. त्यांच्याकडे एकूण ६३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीदारांनाही जप्तीपूर्व नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रतिसाद न देणार्‍या मालमत्ताधारकांच्या मालमत्ता जप्त केल्या जाणार आहेत. टेलिकॉलिंगद्वारे मालमत्ताधारकांना मालमत्ताकरांचे बिल भरण्याबाबत सूचित केले जाणार आहे. तसेच, मोबाईलवर एसएमएस पाठविले जात आहेत. थकबाकीदार तसेच, मालमत्ताधारकांनी मालकत्ताकराचे बिल भरून कारवाई टाळावी, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.

४३ मालमत्तांचा लिलाव सुरू

मोठी थकबाकी असलेल्या एकूण ४३ मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आयुक्तांनी त्या मालमत्तांचा लिलाव करण्यास परवानगी दिली आहे. लवकर त्या मालमत्ताचा प्रत्यक्ष लिलाव केला जाणार आहे, असे साहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.

पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकीदार १ हजार ३२ थकबाकी १४० कोटी

तीन लाखांपेक्षा अधिक थकबाकीदार १ हजार ६३२ थकबाकी ६३ कोटी

सर्व प्रकाराची एकूण थकबाकी ८६२ कोटी, ७० लाख

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest