पिंपरी-चिंचवड महापालिका उभारणार भोसरीत देशातील पहिले संविधान भवन
पिंपरी-चिंचवड : देशाच्या राज्यघटनेचा प्रचार, प्रसार आणि जनजागृतीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) वतीने शहरात संविधान भवन (Constitution Bhavan) उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे १२० कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच भोसरीत संविधान भवन उभारणीस मान्यता दिली होती. त्यानंतर महापालिकेने आता प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिकेकडून चिखली प्राधिकरण पेठ क्रमांक ११ मध्ये संविधान भवन व विपश्यना केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पीएमआरडीएकडून संबंधित जागा महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्याची ई-निविदा दोन कोटी ५३ लाख २५ हजार ४०७ आणि दुसऱ्या टप्प्यातील सुमारे ११७ कोटी अशी एकूण ११९ कोटी ७१ लाख ३५ हजार ३२६ रुपयांची निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. नवनगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून संविधान भवन उभारणीसाठी पाठपुरावा सुरू केला. प्राधिकरणाकडून महापालिकेकडे जागा हस्तांतरित झाली आहे. आता संविधान भवन उभारणीसाठी निविदा प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शहरात संविधान तथा राज्य घटनेचा प्रचार, प्रसार व्हावा. यासह जगभरातील लोकशाही देशाच्या घटनांचा अभ्यास करता येणार आहे. संविधान जागृती आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी उभारण्याच्या कामाला गती मिळणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.