पालिकेचा आरक्षित भूखंड लाटला; महापालिकेच्या जागेवर सदनिका, व्यावसायिक गाळे बांधून विक्री?

महापालिकेच्या ताब्यात असलेल्या वाल्हेकरवाडी येथील आरक्षित जागेवर अनधिकृत सदनिका, व्यावसायिक गाळे बांधून त्यांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पालिकेचा आरक्षित भूखंड लाटला; महापालिकेच्या जागेवर सदनिका, व्यावसायिक गाळे बांधून विक्री?

भूमी व जिंदगी विभागाच्या ताब्यातील जागेवर अनधिकृत बांधकामे

महापालिकेच्या ताब्यात असलेल्या वाल्हेकरवाडी येथील आरक्षित जागेवर अनधिकृत सदनिका, व्यावसायिक गाळे बांधून त्यांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका खासगी बिल्डरने हा प्रकार केला असून त्यांची तक्रार आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे करण्यात आली आहे. ही जागा महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाच्या ताब्यात असून त्या जागेकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हे पीएमआरडीएमध्ये विलिनीकरण केलेले आहे. त्यामुळे नवनगर विकास प्राधिकरणातील काही जागा ह्या पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे वर्ग करण्यात आलेल्या होत्या. वाल्हेकरवाडी येथील २४ मीटर रोडलगत पूर्वी त्या जागेवर जुने ममेली मंगल कार्यालय होते. ते पाडून प्राधिकरणाने त्या जागेला वाॅल कंपाऊंड करत जागा ताब्यात घेतली होती. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (जमीन व मालमत्ता विभाग) यांनी ४ आॅगस्ट २०२२ रोजी सदरची मिळकत पिंपरी-चिंचवड महापालिकेला नागरी सुविधा पुरवण्यासाठी ही जागा हस्तांतरित करण्यात आली.महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाकडे नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील चिंचवड पेठ क्रमांक ३० मधील जागा ताब्यात देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये वाल्हेकरवाडी येथील सर्व्हे १२६ आणि १३३ मधील जागा महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाकडे वर्ग करून ताबा पावती देखील केलेली आहे. त्यावेळी सदरची जागा महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाने ताब्यात घेतलेली आहे.

चिंचवडच्या पेठ क्रमांक ३० मधील वाल्हेकरवाडी सर्व्हे नंबर १२६ मध्ये ७ गुंठे जागा आहे. तर सर्व्हे नंबर १३३ मध्ये ५ गुंठे जागा आहे. सदरच्या दोन्ही जागा २४ मीटर रोडलगत आहेत. दोन्ही जागेवर एका खासगी बांधकाम व्यावसायिकाने सुरुवातीला पत्राशेड करून अतिक्रमण केले. त्यानंतर त्या जागेवर आरसीसी बांधकाम करत काही सदनिका आणि व्यावसायिक गाळे बांधून त्यांची विक्री केलेली आहे. दरम्यान, महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाकडे नागरी सुविधा पुरवण्यासाठी हस्तांतरित केलेल्या जागेवर एका खासगी बांधकाम व्यावसायिकाने अतिक्रमण केलेले आहे. सदरची महापालिकेची जागेवर ताबा मारून भूखंड लाटला आहे. त्या जागेवर आरसीसी बांधकाम करत तीन मजली इमारत बांधली आहे. त्यात काही सदनिका आणि व्यावसायिक गाळे बांधून त्यांची विक्री करत कोट्यवधी रुपये लाटले आहेत. याकडे महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. या तक्रारीबाबत महापालिकेच्या अतिक्रमण आणि भूमी व जिंदगी विभागातील अधिका-यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतू, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

महापालिकेच्या ताब्यात असलेला भूखंड एका खासगी बिल्डराने लाटला आहे. वाल्हेकरवाडी येथील २४ मीटर रोडलगत लाखो रुपयांचा भूखंडावर ताबा मारत दोन्ही जागेवर अतिक्रमण केले. त्या बिल्डरने संबंधित जागेवर सदनिका व गाळे बांधून विक्री देखील केल्याने नागरिकांची फसवणूक झाली आहे. सदर जागेवरचे अतिक्रमण महापालिकेने तत्काळ पाडून ही जागा ताब्यात घ्यावी, त्या जागेवर नागरी सुविधा पुरवण्यात याव्यात, संबंधित बिल्डरवर फौजदारी खटला दाखल करावा, अशी मागणी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

- प्रभू आसाराम कांगणे,  तक्रारदार नागरिक

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest