संग्रहित छायाचित्र
राज्यातील महत्त्वाच्यापैकी एक असलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर अर्थातच पीआयईसीसी कात टाकणार आहे. भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होण्याच्या दृष्टीने या केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले जाणार आहेत. व्यापार केंद्र (कन्व्हेन्शन हॉल), पंचतारांकित हॉटेल, आर्थिक दृष्ट्या परवडणारी हॉटेल्स, परिषद सभागृह (कॉन्फरन्स हॉल) यासह व्यावसायिक भूखंड विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे येथे जवळपास एक लाख तरुणांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या विकास प्रकल्पांमुळे पिंपरी-चिंचवडच्या वैभवातही मोठ्या प्रमाणात भर पडेल.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अंतर्गत मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि व्यापार केंद्र येथे ९६ हेक्टर भूखंडावर सुमारे २ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. यापैकी अर्थसंकल्पामध्ये जवळपास ९८२ कोटी अंदाजित खर्च आहे. पीएमआरडीएच्या मोशी येथील भूखंडावर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र विकसित करण्यात येत आहे. याठिकाणी आजपर्यंत आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन, लष्कराचे शस्त्रास्त्र प्रदर्शन भरवण्यात आले. त्याचप्रमाणे ऑटोमॅटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया याचे देखील प्रदर्शन या ठिकाणी भरवले होते. आत्तापर्यंत जवळपास १२ हुन अधिक प्रदर्शन व कार्यक्रम या ठिकाणी झाले.
पीएमआरडीए स्वतः बांधकाम क्षेत्रातील उद्योजकांसाठी येथे दर्जेदार बांधकामांशी संबंधित प्रदर्शन भरवत असते. केंद्रातील केवळ दहा टक्के विकास प्रकल्प आजपर्यंत विकसित आले आहेत. आता उर्वरीत विकास प्रकल्पही विकसित करण्यात येणार आहेत. महानगर आयुक्त योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शन केंद्रातील ९६ हेक्टर जागेवर मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येणार आहेत. तब्बल ५ हजार प्रेक्षकांची आसन क्षमता असणारा कन्व्हेन्शन हॉल तयार करण्यात येणार आहे. ३५ हजार स्क्वेअर मीटरचे ३ सभागृह तयार करण्यात येणार आहेत. एक पंचतारांकीत हॉटेल आणि सर्वसामान्यांना परवडणारे तीन हॉटेल बांधण्यात येणार आहेत. उर्वरीत मोकळ्या भूखंडावर वाणिज्य वापरासाठी प्लॉटींग विकसित करण्यात येणार आहे.
विकासकामांचे विविध टप्पे करण्यात आले आहेत. हे काम पूर्ण होण्यासाठी किमान दहा वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. हा संपूर्ण प्रकल्प विकसित झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडसह लगतच्या भागातील तरुणांसाठी किमान एक लाख नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पातील सर्व विकासकामे पीपीपी तत्वावर करण्यात येईल, महानगर आयुक्त योगेश म्हसे यांच्या सूचनेनुसार हा प्रकल्प तयार होणार आहे.
प्रदर्शनाच्या माध्यमातून सव्वा दोन कोटींचा महसूल
या केंद्रात मंजूर आराखड्यानुसार एकूण क्षेत्र ९६. ९७ हेक्टर आहे. तर, खुले प्रदर्शन केंद्र ९.८० हेक्टर वर उभारण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यात चालू वर्षामध्ये जवळपास ९ मोठे प्रदर्शन भरवण्यात आले होते. काही प्रदर्शन दोन दिवस तर, काही पंधरा दिवस होते. या माध्यमातून प्राधिकरणा जमीन व महसूल विभागात तब्बल २ कोटी ३० लाख ७२ हजारांचा महसूल प्राप्त झालेला आहे.
असा आहे प्रकल्प
या ठिकाणी मास्टर प्लॅन यानुसार तयार केलेल्या आराखड्यात अध्यायावत संग्रहालय, अग्निशमन केंद्र, प्रशासकीय केंद्र, व्हीआयपी बैठक व्यवस्था, बहुस्तरीय कार पार्किंग, व्यापारी केंद्र, मेट्रो स्टेशन, बजेट हॉटेल, प्राथमिक शाळा, रुग्णालय यासारखे काही प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी ९८२ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च आहे. हा प्रकल्प बांधा, वापरा व हस्तांतरित करा अनुषंगाने उभारण्यात येणार असून त्यासाठी व्यवहार सल्लागार नेमणूक करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड येणार केंद्रस्थानी
प्राधिकरणाकडून उभारण्यात आलेला हा प्रकल्प दहा वर्षांत पूर्ण होईल. त्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर मोठ्या प्रमाणात केंद्रस्थानी होणार आहे. सद्यस्थितीत बंगळूर, मुंबई आणि त्यानंतर मोशी या ठिकाणी प्रदर्शन केंद्रासाठी मागणी होऊ लागली आहे. आणखी काही प्रकल्प प्राधिकरणाकडे विचाराधीन आहेत. या प्रकल्पांमुळे शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रभाकर वसईकर यांनी दिली.
मोशीत उभारण्यात येणाऱ्या अद्ययावत प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटरमुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या वैभवात आणखी भर पडेल.या प्रकल्पाबद्दल वेळोवेळी आढावा घेण्यात येत असून, त्या अनुषंगाने एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट काढले आहे. लवकरच त्यावर कार्यवाही होणार आहे.
- डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.