मोशी येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्वेंशन सेंटर अर्थात पीआयईसीसी प्रकल्प करोडो रुपये खर्चून उभारण्यात आलेला आहे. मात्र, या केंद्राच्या सीमा भिंतीलगत मोठ्या प्रमाणात कचरा आणि राडारोडा टाकला जात आहे. जवळच असणाऱ्या उपबाजार समितीतून खराब झालेला भाजीपाला काही विक्रेते टेम्पोमधून तसेच, राडारोडादेखील याच ठिकाणी आणून टाकला जात आहे.
यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना अस्वच्छतेचे दर्शन घडत आहे. विशेष म्हणजे या केंद्रामध्ये राज्यातील नव्हे तर, देशातील विविध भागातून विजिटर येत असतात. मात्र, पीएमआरडीए आणि पिंपरी-चिंचवड महापालिका याकडे दुर्लक्ष करत आहे.
या ठिकाणी देखील वेगवेगळ्या प्रकारचा कचरा आणून टाकला जात आहे. सेक्टर क्र. ४ या परिसरातदेखील हीच परिस्थिती आहे. नियोजनबद्ध विकास झालेल्या ठिकाणी उघड्यावरच कचरा टाकला जात आहे. यात भर म्हणून मोशी प्रादेशिक परिवहन कार्यालयात येणाऱ्या वाहन चालक आपल्या वाहनाला रिफ्लेक्टर पट्ट्या लावल्यानंतर त्याचा कचरा संपूर्ण रस्त्यावर टाकत आहेत. यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत. यापूर्वी या ठिकाणी वाहने पार्क करण्यात येत होती. मात्र आता मोठ्या प्रमाणात कचरा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रदर्शन केंद्राची सीमा भिंत आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यामधून जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूने कचरा उघड्यावरच टाकला जात आहे. या रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी येथील नागरिक चालण्यासाठी येत असतात. मात्र, येथील रस्त्याच्या कडे असणारे फुटपाथ मात्र गायब झाले आहेत. फुटपाथवर झाडे झुडपे, मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत, फुटपाथवरील पेव्हिंग ब्लॉक निघालेले यामुळेच येथील नागरिकांना नाईलाजास्तव जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागत आहे.
प्रदर्शन केंद्राच्या पश्चिम बाजूस देखील अशीच दुरवस्था झालेली असून भिंतीलगत मोठ्या प्रमाणात उघड्यावरच कचरा टाकला जात आहे. येथून औद्योगिक क्षेत्र जवळच असल्याने अनेक कामगार पायी चालत जात येत असतात. मात्र, त्यांना या कचऱ्याच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. जवळच अनेक गृहप्रकल्प उभारले जात असतानाच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत नसल्याबाबत नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
या ठिकाणी कचरा टाकण्यात येतो. एवढेच नव्हे तर या केंद्राची सीमा भिंत फोडून काहीजणांनी विटा चोरून नेल्या आहेत. तर, घरातील कचरा या ठिकाणी फेकला जातो. महापालिकेचा कोणताच विभाग याकडे लक्ष देण्यास तयार नाही. याबाबत अनेकदा सारथीवर तक्रार देखील केली आहे...
- सुभाष नाईक, स्थानिक नागरिक, मोशी
महापालिकेच्या वतीने दररोज त्या ठिकाणचा कचरा उचलला जातो. त्या संबंधित सूचनादेखील देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांनी कचरा कृपया त्या ठिकाणी टाकू नये. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करावी लागणार. आरटीओ अधिकाऱ्यांसोबत त्या परिसरातील कचरा समस्येबाबत लवकरच बैठक घेणार आहे.
- अण्णा बोदाडे, क्षेत्रीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.