संग्रहित छायाचित्र
महापालिकेच्या इंद्रायणीनगर, भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील अॅथलेटिक्सचा सिंथेटिक ट्रॅक (कृत्रिम मार्गिका) हलक्या दर्जाचा असल्याने तो काही महिन्यांनी उखडला. त्यामुळे ट्रॅकची दूरवस्था झाली होती. ट्रॅक खराब झाल्याने खेळाडूंना सराव करताना अडचणी येत होत्या. तो ट्रॅक दुरूस्त करून घेण्यात आला आहे. सुमार दर्जाचे काम करूनही संबंधित ठेकेदार व सल्लागारावर कारवाई करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अॅथलेटिक्स खेळाचा सराव करणार्या खेळाडूंना सरावासाठी शहरातील एकमेव सिंथेटिक ट्रॅक इंद्रायणी नगर येथे आहे. या ठिकाणी ४०० मीटर अंतराचा आठ लेनचा सिंथेटिक ट्रॅक आहे. दहा वर्षांपूर्वी हा ट्रॅक तयार करण्यात आला होता. अनेक वर्षांपासून ट्रॅकवर खेळाडूंचा नियमित सराव आणि विविध स्पर्धांमुळे तसेच, बाहेरील वातावरणामुळे जुना ट्रॅक खराब झाला होता. जुना खराब सिंथेटिक ट्रॅक बदलण्याचे काम गेल्या वर्षी हाती घेण्यात आले. नव्या ट्रॅकसाठी सुमारे चार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. नोव्हेबर २०२३ ला नवीन ट्रॅक खेळाडूंसाठी खुला करण्यात आला. ट्रॅक काही ठिकाणी फाटल्याने दोन महिन्यांतच पुन्हा हा ट्रॅक दुरुस्तीच्या नावाखाली बंद करण्यात आला. त्यानंतर १५ मार्च २०२४ ला हा ट्रॅक पुन्हा सरावासाठी खुला करण्यात आला. ट्रॅक अनेक ठिकाणी उखडल्याचे समोर आले आहे. त्यानंतर किरकोळ दुरूस्ती करण्यात आली. मात्र, दुरूस्ती करूनही ट्रॅक पुन्हा फाटला. ट्रॅकची दूरवस्था झाल्याने धावपटूंना सराव करताना अडचणी येत होत्या.
तो ट्रॅक पुन्हा संबंधित ठेकेदारांकडून दुरूस्ती करून घेण्यात आला आहे. आता सरावासाठी ट्रॅक खुला झाला आहे. सुमार दर्जाचे काम केल्याने वारंवार ट्रॅक खराब होत आहे. त्यामुळे महापालिकेची नाहक बदनामी होत आहे. असे असताना संबंधित ठेकेदार व सल्लागारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी झाली होती. मात्र, महापालिकेने त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता अभय दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ठेकेदारांवर कारवाईचा प्रश्नच उद्भवत नाही
सिंथेटिक ट्रॅक बनवणाऱ्या संबंधित ठेकेदाराकडूनच दुरूस्ती काम करण्यात आले आहे. त्या कामाचा मोबदला त्यांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदार तसेच, सल्लागारावर कारवाई करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही, असे महापालिकेचे सहशहर अभियंता मनोज सेठिया यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.