चिखली जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता दोनशे एमएलडीने वाढविणार

महापालिका भामाआसखेड व आंद्रा धरणातून एकूण २६७ एमएलडी पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणणार आहे. त्यासाठी चिखली केंद्राची क्षमता आणखी २०० एमएलडीने वाढविण्यात येणार आहे. त्या कामासाठी ९१ कोटी २० लाख खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.

चिखली जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता दोनशे एमएलडीने वाढविणार

आयुक्तांची ९१ कोटी २० लाख खर्चास मंजुरी, भविष्याचा विचार करून क्षमता वाढवली

महापालिका भामाआसखेड व आंद्रा धरणातून एकूण २६७ एमएलडी पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणणार आहे. त्यासाठी चिखली केंद्राची क्षमता आणखी २०० एमएलडीने वाढविण्यात येणार आहे. त्या कामासाठी ९१ कोटी २० लाख खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.

आंद्रा धरणातून पाणी आणण्यास विलंब होणार असल्याने तळवडे येथील निघोजे जलउपसा केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रातून पाणी उचलून ते चिखली केंद्रात आणले जाते. पाणी शुद्धीकरण करून त्या भागात पाणीपुरवठा केला जात आहे. तेथून १०० एमएलडी पाणी उचलण्यास मान्यता आहे. महापालिकेकडून सध्या ७० एमएलडी पाणी उचलले जात आहे.

येत्या वर्षभरात खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून १६७ एमएलडी पाणी मिळणार आहे. त्यामुळे चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यात येणार आहे. भविष्यातील गरज म्हणून चिखली केंद्रात ३०० एमएलडी पाणी क्षमतेची रचना करून ठेवण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १०० एमएलडी काम पूर्ण करण्यात आले आहे. आता २०० एमएलडी क्षमतेचे शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दोनशे एमएलडी क्षमतेचे नवीन शुद्धीकरण केंद्र उभारणे व त्यासाठी आवश्यक स्थापत्य काम करण्यसाठी पाणीपुरवठा विभागाने ६७ कोटी ५२ लाख ३८ हजार ७९९ रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध केली होती. त्यासाठी एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर आणि जिओ मिलर अ‍ॅण्ड कंपनी यांच्या दोन निविदा प्राप्त झाल्या. एसएमसीची ५ टक्के अधिक दराची ७० कोटी ७१ लाख ४२ हजार ९४७ खर्चाची निविदा स्वीकृत करण्यात आली आहे. काम झाल्यानंतर दहा वर्षे परिचालन, देखभाल व दुरुस्तीसाठी २० कोटी ५० लाख खर्च आहे. असे एकूण ९१ कोटी २१ लाख ४३ हजार खर्च होणार आहे. या खर्चास आयुक्त सिंह यांनी शुक्रवारी  मान्यता दिली आहे. हे काम सव्वादोन वर्षांत पूर्ण करण्याची मुदत आहे.

जलशुद्धीकरणाची क्षमता वाढविणार

आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून एकूण २७६ एमएलडी पाणी शहराला मिळणार आहे. भविष्यात त्यात वाढ होऊ शकते. त्यादृष्टीने चिखली जलशुद्धीकरण केंद्राची रचना ३०० एमएलडी क्षमतेची करून ठेवण्यात आली आहे. भामा आसखेड पाणी योजनेचे काम दृष्टिक्षेपात आले आहे. त्यामुळे चिखली केंद्राची क्षमता २०० एमएलडीने वाढविण्यात येत आहे. या अतिरिक्त पाण्यामुळे परिसरातील पाण्याची समस्या सुटण्यास मदत होणार आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest