हजार कोटींचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सुट्टीलाही करसंकलन कार्यालये सुरू

करसंकलन व करआकारणी विभाग करवसुलीचे १ हजार कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध प्रयत्न करत आहे. आता नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही कर भरता यावा, यासाठी ३१ मार्चपर्यंत करसंकलन कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

संग्रहित छायाचित्र

विकास शिंदे
करसंकलन व करआकारणी विभाग करवसुलीचे १ हजार कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध प्रयत्न करत आहे. आता नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही कर भरता यावा, यासाठी ३१ मार्चपर्यंत करसंकलन कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी १७ विभागीय कार्यालये आणि ऑनलाइनची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आत्तापर्यंत ८४० कोटी रुपयांचा कर पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. १ हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी करसंकलन विभागाने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे, वर्तमानपत्रात नावे प्रसिद्ध करणे, नळ कनेक्शन खंडित करणे, जप्त मालमत्तांचा लिलाव करणे, यासारखे कठोर उपाय योजले आहेत. नागरिकांना कर भरण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी करसंकलन विभाग विशेष खबरदारी घेत आहे. शनिवार, रविवार महापालिकेला सुट्टी असली तरी ३१ मार्चपर्यंत या दोन्ही दिवशी कर संकलन कार्यालये सुरूच असतील.

सणादिवशी कार्यालये सुरू 

२५ मार्चला धुलिवंदन आणि २९ मार्चला गुड फ्रायडेची महापालिकेला शासकीय सुट्टी आहे. मात्र, या दोन्ही दिवशी नागरिकांच्या सोयीसाठी करसंकलन कार्यालये सुरू राहणार आहेत.

असे असणार नियोजन

नागरिकांच्या सोयीसाठी कर भरण्यासाठी वेळ वाढविली आहे. शुक्रवार (दि. १५) पासून  २४ मार्चपर्यंत सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कॅश काऊंटर सुरू ठेवण्यात येणार आहेत. २५ ते ३१ मार्चपर्यंत सकाळी ९.४५ ते रात्री ८ वाजेपर्यंत कॅश काऊंटरवर मालमत्ता कराचा भरणा स्वीकारला जाणार आहे, याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest