तळवडे आग दुर्घटना; आणखी २ महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू
पिंपरी : तळवडे एमआयडीसीमध्ये वाढदिवसाला केकवर (Talwade Fire) लावणाऱ्या मेणबत्ती फटाक्यांच्या कंपनीत लागलेल्या आगीत आणखी दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. तळवडे आग दुर्घटनेत आतापर्यंत मृतांची संख्या ११ वर पोहचली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान या दोन जखमींचे निधन झाले आहे.
प्रियंका यादव (Priyanka Yadav) (वय ३२ वर्षे) यांचे रात्री पावणे दोन वाजता तर अपेक्षा तोरणे (Apeksha Torane) (वय १८ वर्षे) यांचे सकाळी साडे सहा वाजता ससून रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान आज निधन झाले आहे. वाढदिवसाला केकवर लावण्यात येणाऱ्या फायर क्रैकर कारखान्यात स्फोट झाल्याने सात महिलांचा जागेवरच होरपळून मृत्यू झाला होता. शुक्रवारी (दि. ८) दुपारी पिपरी- चिंचवड महापालिका हद्दीतील तळवडे येथील एका अनधिकृत कारखान्यात हा भयंकर स्फोट झाला. यात नऊ महिला आणि एक पुरुष गंभीररित्या भाजले होते त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील प्रतिक्षा तोरणे (वय १६ वर्षे) आणि कविता राठोड (वय ४५ वर्षे) यांचे दि.९ डिसेंबर रोजी तर शिल्पा राठोड (वय ३१ वर्षे) यांचे दि. १० डिसेंबर रोजी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. तर उर्वरीत जखमींपैकी आज २ जणांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यामुळे तळवडे आग दुर्घटनेतील आतापर्यंतच्या मृतांची संख्या ११ इतकी झाली आहे.
कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी : आयुक्त
मृतांबद्दल आयुक्त शेखर सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. मनाला वेदना देणारा हा प्रसंग असुन कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असुन मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
या घटनेतील जखमी रुग्ण उषा पाडवी, सुमन गोंधळे, कोमल चौरे, रेणुका ताथोड आणि शरद सुतार यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.