संग्रहित छायाचित्र
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चाच्या तपासण्या, सर्व कागदपत्रांची पडताळणी करून निवडणूक आयोगाच्या नियमांनुसारच कराव्यात. तसेच, कोणत्याही उमेदवाराच्या खर्चामध्ये तफावत आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार राहून कारवाई करावी, असे निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक प्रेम प्रकाश मीना यांनी दिले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक म्हणून प्रेम प्रकाश मीना (आयआरएस) यांची चिंचवड व पिंपरी विधानसभा मतदारसंघांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. खर्च व्यवस्थापन कक्ष व कक्षाद्वारे करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा आढावा घेतला.
चिंचवड विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी निवडणूक खर्च निरीक्षक प्रेमप्रकाश मीना यांना विविध कक्षांद्वारे चालणाऱ्या कामकाजाची माहिती दिली. यावेळी साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, किशोर ननवरे आदी उपस्थित होते. तर, पिंपरी विधानसभेची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी माहिती दिली. यावेळी साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख, नोडल अधिकारी आश्विनी मुसळे, विविध कक्षाचे समन्वयक माधुरी बांदल, शैलेन्द्र वर्मा, शिल्पा मंकणी, सुनील भागवानी, विजय भोजणे, सचिन चाटे, सुरेंद्र देखमुखे आदी उपस्थित होते.