संग्रहित छायाचित्र
पुणे: बारामती लोकसभा मतदार संघासाठी मतदान प्रक्रियेला सकाळी सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळातच इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांनी बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक्सवर प्रसिध्द केल्याने एकच खळबळ उडाली. याची माहिती मिळताच उमेदवार सुप्रिया सुळे यांनी दत्ता भरणे (Datta Bharne) यांच्या विरोधात सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या व्हिडिओमुळे मतदानावर परिमाण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
View this post on Instagram
दत्ता भरणे यांचा एक व्हिडिओ एक्सवर व्हायरल झाला आहे. यामध्ये ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ व दम भरताना पाहायला मिळत आहेत. हा व्हिडिओ इंदापूर मधील एका गावातील आहे. या व्हिडिओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातच्या कार्यकर्त्यांना ते दमदाटी करताना पाहायला मिळत आहेत. सहानंतर तुम्हाला कोण विचारणार असा प्रश्न विचारत त्यांच्याकडून दमदाटी केली जात आहे. एक आमदाराने अशा प्रकारची दमदाटी केल्याने त्यांच्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. हा व्हिडिओ रोहित पवारांनी ''एक्स''वर प्रसिध्द करुन, केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडीओत बघा. विशेष म्हणजे, ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत. ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही. असे लिहून भरणे यांच्या वागणूकीवर संताप व्यक्त करुन टीका केली आहे. असे असले तरी रोहित पवार यांनी एक्सवर प्रसिध्द केलेला व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे, याबाबत अद्याप काहीही समोर आलेले नाही. मात्र, हा व्हिडिओ आजचा असून मतदारांना धमकावले जात असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.
सुप्रिया सुळे यांना दत्ता भरणे यांनी कार्यकर्त्याला शिवीगाळ केली आहे, याबाबत विचारले असता, याची कोणतीह कल्पना नसून याबाबत रोहित पवारांशी बोलून पुढील निर्णय घेवू असे सांगितले होते. त्यानंत दत्ता भरणे यांनी सुप्रिया सुळे यांचा कार्यकर्ता नाना गवळी याला शिवीगाळ केल्याचे समोर आले, त्याची भेट घेत सुप्रिया सुळे यांनी भरणे यांच्या विरोधात तक्रार केली. यावेळी गवळी म्हणाले की, 'आमचे कार्यकर्ते बसले होते. त्यावेळी भरणे गाडीतून आले आणि त्यांनी शिवीगाळ सुरु केली. तुम्हाला माझ्याशिवाय कोणी नाही. तुम्हाला इथंच राहायचं आहे. आम्ही सुळे गटाचे असल्याने त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली.' असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता भरणे यांच्यावर निवडणुक आयोगाकडून काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. बारामती मतदार संघात मतदानाला सुरवात झाल्यानंतर हा व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वातावरण चांगलेच गाजले होते. दत्ता भरणे यांचे हे शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे याचा मतदानावर परिमाण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणावर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी म्हणाले की विरोधकांकडून खोटे आरोप करण्यात आले आहे. समोरच्याच व्यक्तीने शिवीगाळ केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवीगाळ करावी लागली, असे ते म्हणाले आहेत. दरम्यान, आज राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. राज्यातील ११ मतदारसंघात मतदान होत आहे. यात बारामती लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. शरद पवार यांनी देखील इंदापूर येथील सभेत बोलताना दमदाटी करणाऱ्यांना जागा दाखवा असा इशारा दिला होता. त्यांनी थेट दत्ता मामा भरणे यांना इशारा दिला होता.
"मी माझ्या मराठी भाषेमध्ये बोललो आहे. मी शिवीगाळ केलेली नाही. मतदान असल्यामुळे मी गावामध्ये फिरत होतो. अंथूर्ने येथे मला कार्यकर्त्यांची गर्दी दिसली. कार्यकर्त्यांचे भांडण दिसलं. पैसे वाटप होत असल्याचं मला कळालं. त्यामुळे मी तिथे उतरलो. तो कार्यकर्ता नव्हता. बारामती अॅग्रोमधला तो एक कर्मचारी होता. त्याने गावकऱ्यांविषयी आरेतुरेची भाषा केली. माझ्याविषयी देखील त्याने अपशब्द वापरला. मी पण माणूस आहे. त्यामुळे मी जर तिथे नसतो, तर अनर्थ घडला असता. कारण, गावकरी त्याच्या अंगावर जाऊन मारहाण करणार होते. तो पैसे वाटप करत होता आणि कार्यकर्त्यांना धमकावत होता. त्यामुळे मी त्याला माझ्या मराठी भाषेमध्ये झापले आहे. मी तक्रार करणारा माणूस नाही. पण, कोणी तक्रार केली तर त्याला आम्ही कायदेशीर उत्तर नक्की देऊ."
- आमदार दत्ता भरणे
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.