महिलांच्या स्वावलंबनासाठी अत्याधुनिक शिलाई केंद्र

पारंपरिक शिवणकामापेक्षा बाजारपेठेतील मागणी ओळखून त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेऊन अत्याधुनिक पद्धतीच्या शिवणकामावर भर देऊन उत्पादनाची गुणवत्ता अधिकाधिक वाढवावी. तसेच जास्तीत जास्त महिलांनी महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या शिलाई केंद्राचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 17 Dec 2024
  • 11:56 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

शिवणकामावर भर देऊन उत्पादनाची गुणवत्ता वाढवावी, प्रदीप जांभळे पाटील यांचे आवाहन

पारंपरिक शिवणकामापेक्षा बाजारपेठेतील मागणी ओळखून त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेऊन अत्याधुनिक पद्धतीच्या शिवणकामावर भर देऊन उत्पादनाची गुणवत्ता अधिकाधिक वाढवावी. तसेच जास्तीत जास्त महिलांनी महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या शिलाई केंद्राचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, बीएमसी सॉफ्टवेअर इंडिया आणि थिंक शार्प फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी येथे शिलाई केंद्राची उभारणी करण्यात आली असून या केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उपायुक्त राजेश आगळे, साहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, बीएमसी सॉफ्टवेअर इंडियाचे सीएसआर हेड चावला दिवानजी, व्यवस्थापक गिरीश के., थिंक शार्प फाऊंडेशनचे संतोष फड, आकाश देवकर, अमित कोतवाल यांच्यासह टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हस ट्रस्ट (टाटा स्ट्राइव्ह) सक्षमा उपक्रमाचे सदस्य तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे म्हणाले, महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी तसेच त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यास महिलांचाही उत्तम प्रतिसाद मिळत असून ही समाधानकारक बाब आहे. महिलांमध्ये असणाऱ्या विविध कलागुणांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांना स्वावलंबी करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. त्याच धर्तीवर महापालिका आणि बीएमसी सॉफ्टवेअर इंडिया आणि थिंक शार्प फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिलाई केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. ज्या महिलांना शिलाई मशिनसाठी भांडवल तसेच जागा उपलब्ध नाही अशा महिला शिलाई केंद्रात उपलब्ध असणाऱ्या शिलाई मशिनवर काम करू शकतात. तसेच ज्या महिलांना प्रशिक्षणाची आवश्यकता असल्यास त्या महिलांना योग्य प्रशिक्षणाची व्यवस्थाही या ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती जांभळे पाटील यांनी दिली.

अत्याधुनिक पद्धतीच्या शिवणकामाचे प्रशिक्षण घेतल्यास बाजारपेठेत जास्त मागणी असलेल्या गोष्टी तयार करण्याचे कसब विकसित होईल. तसेच हे शिलाई केंद्र उत्तम पद्धतीने चालवण्यास मदत होईल, असे मत जांभळे पाटील यांनी व्यक्त केले. शिलाई केंद्रातील रेखा सोमवंशी यांनी आपले मत व्यक्त करताना महापालिकेचे आभार मानले. त्या म्हणाल्या, ‘बऱ्याच महिलांना शिवणकला अवगत असते तर काही महिलांना शिवणकलेची आवड असते. परंतु, ज्या महिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असते अशा महिलांना इच्छा असूनदेखील शिलाई मशिन घेणे शक्य होत नाही. महापालिका आमच्यासारख्या गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जी मदत करत आहे त्यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला असून त्या स्वावलंबी बनत आहेत. महापालिकेने आम्हाला पाठबळ दिले तसेच आम्हाला उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. जोमाने काम करून मिळालेल्या संधीचे आम्ही सोने करू’, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी शिलाई केंद्राची पाहणी केली. यावेळी महिलांनी त्यांनी बनवलेल्या कापडी वस्तू दाखवल्या. तसेच काही महिलांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निराकरण जांभळे पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी केले, तर सूत्रसंचालन पौर्णिमा भोर यांनी केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest