सहा आरएमसी प्लँट अखेर बंद!
ताथवडे शनिमंदिर रोडवरील (Shani Mandir Road Tathwade) मारुंजी हद्दीतील आरएमसी प्लँटमुळे (रेडी मिक्स सिमेंट प्लँट) पुनावळे, ताथवडे आणि वाकड परिसरात हवा, ध्वनी प्रदूषण होत आहे. चोवीस तास सुरु असलेल्या आरएमसी प्लँटमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ॲक्शन मोडमध्ये आले असून विनापरवानगी सुरु असलेले सात आरएमसी प्लँट बंद करण्याचे आदेश दिले आहेत तर काहींना नोटीस बजावुन खुलासा मागविला आहे.
महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडे पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) सोसायटी फेडरेशनने याबबात तक्रार केली होती. त्यानूसार महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून एमपीसीबीकडे पत्राद्वारे कडक कारवाईची मागणी केली होती. याबाबत ‘सीविक मिरर’ ने आरएमसी प्लँटने होणाऱ्या हवा- ध्वनी प्रदूषणाचा आवाज उठविल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कडक कारवाई केली आहे.
बांधकामासाठी वापरल्या आणाऱ्या आरएमसी प्लँटवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ॲक्शन घेण्यास सुरुवात केली आहे. ताथवडे शनिमंदिर रोडवरील मारुंजी हद्दीतील प्लँटमुळे प्रदूषण होते, नियमांचे उल्लंघन होत आहे, असे सात प्लँट बंद करण्याचा आदेश ‘एमपीसीबी’चे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे यांनी दिले आहेत. तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील आरएमसी प्लँटबाबत सर्वेक्षण सुरू असून, नियमबाह्य असणा-यावर कारवाई केली जाणार आहे. (RMC Plants)
या आरएमसी प्लँटमुळे प्रदूषणात अधिक वाढ होऊ लागली होती. त्यामुळे नागरिकांकडून खूप तक्रारी ‘एमपीसीबी’कडे येत आहेत. या तक्रारींवरूनच एक मार्चपासून पुण्यात व पिंपरी-चिंचवडमध्ये सर्व्हे करण्यात येत आहे. ज्याठिकाणी नियमांचे पालन केले नसेल, त्याठिकाणी अधिकारी लगेच नोटीस बजावत आहेत. काही अटी पाळल्या नसतील, तर त्यांना नोटीस देऊन सुधारणा करण्यासाठी वेळही दिला आहे.
सदरचे रेडी मिक्स काँक्रिट (आर एम सी) प्लॅंट मुळे ताथवडे, वाकड, पुनावळे यासह अन्य भागात मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरत होते. धूळ हवेत जात असल्याने हवा अशुध्द होत होती. हे आरएमसी प्लॅंट रात्र-दिवस सुरु राहिल्याने ध्वनी प्रदुषणदेखील वाढले होते.
हिंजवडी आयटी क्षेत्रामुळे त्या भागात काही शाळा, कॉलेज आणि रहिवाशी क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या आरएमसी प्लॅंटमुळे लहान मुले, शाळेचे विद्यार्थी, अबालवृध्द ज्येष्ठ नागरिक, महिलासह पुरुषांना श्वसानाचा त्रास वाढला होता.
तसेच सर्वच आरएमसी प्लॅंट हे रात्रभर सुरु असतात. त्याच्या वाहनाची वर्दळ आणि प्लँटमधील मशीनचा कर्णकर्क्कश आवाज सुरु असतो. त्यामुळे ताथवडे, वाकड, पुनावळे भागातील सोसायटीतील नागरिकांना अशुध्द हवा, ध्वनी प्रदूषणामुळे रात्रभर झोपच लागत नाही. त्यामुळे या आरएमसी प्लॅंटवर तत्काळ कारवाई करुन हे प्लॅंट बंद करा, अशी मागणी नागरिकांतून होत होती.
दरम्यान, ताथवडे, मारुजी, नांदे या ठिकाणचे प्लँट बंद करण्यात आले आहेत. नांदे गावातील एका प्लँटला बंद करण्याची नोटीस दिली आहे तर मारुंजी येथील सहा प्लँटचे काम या अगोदरच बंद केले आहे. कोणत्याही ठिकाणी बांधकाम करताना, त्या जागेभोवती सुरक्षा कवच आवश्यक असते, जेणेकरून आजूबाजूला धूळ जाणार नाही. नागरिकांना त्रास होणार नाही. नियमानुसार, बॅरिकेट किमान ५ फूट आणि अधिकाधिक २० फुटांचा असणे आवश्यक आहे. तसेच पाण्याचा मारा करणे आवश्यक असून यामुळे धूळ पसरणार नाही. याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. विनापरवानगी सुरु असलेले सात आरएमसी प्लँट बंद करण्यात आले असून इतरांना नोटीस दिल्या आहेत.
रेडी मिक्स काँक्रीट प्लँटमुळे हवा-ध्वनी प्रदूषण होते. नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानंतर अधिकाऱ्याऱ्यांनी जागेवर जाऊन पाहणी केली. ज्यांनी नियम पाळले नाही, त्यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे. सात प्लँट पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. त्यात मारुंजी सहा आणि अन्य एका ठिकाणचा आहे. ज्यांच्यात सुधारणा आवश्यक आहेत, त्यांना नोटिसा दिल्या आहेत. काम बंद पाडणे हा आमचा हेतू नाही. नियमानुसार काम व्हावे. कोणालाही त्रास होऊ नये, यासाठी आम्ही कारवाई करीत आहोत. अनेक आरएमसी प्लँट नी परवानगीच घेतलेली नाही. ते बंद करण्यात येत आहेत.
– रवींद्र आंधळे, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.