संग्रहित छायाचित्र
श्रीमोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळा १७ ते २१ डिसेंबर या कालावधीत चिंचवड येथे आयोजित केला आहे. या दरम्यान धार्मिक कार्यक्रम व उपशास्त्रीय व सुगम संगीत, तसेच व्याख्यान, आरोग्य व रक्तदान शिबिरांसह विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संजीवन समाधी सोहळ्याचे यंदाचे ४६३ वे वर्ष आहे.
महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या शुभ हस्ते होणार आहे. या प्रसंगी महापालिका आयुक्त शेखर सिंह, धर्मादाय सहआयुक्त रजनी क्षीरसागर, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे तसेच, आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे मुख्य विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, श्री मार्तंड मल्हारी संस्थान जेजुरीचे मुख्य विश्वस्त अभिजित देवकाते तसेच चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस, ॲड. राजेंद्र उमाप, ॲड. देवराज डहाळे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी दिली.
या कालावधीत रोज सकाळी ६ वाजता नितीन दैठणकर यांचे समाधी मंदिर येथे व तुकाराम दैठणकर यांचे श्रीमंगलमूर्ती वाडा येथे सनई-चौघडा वादन होईल. सायंकाळी ५.३० वाजता संजीवन समाधी सोहळ्याचे उद्घाटन होईल. दुसऱ्या दिवशी सामूहिक अथर्वशीर्ष पठण, सामूहिक अभिषेक, त्याचप्रमाणे नेत्र व दंत चिकित्सा शिबिर होईल. त्यानंतर श्री सुक्त पठण होईल.
२० डिसेंबरला सायंकाळी ६ ते ८ दरम्यान श्री मोरया गोसावी महाराज जीवन गौरव पुरस्कार पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना पंडितप्रवर गणेश्वरशास्त्री द्राविड आणि चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ यांच्या शुभ हस्ते देण्यात येणार आहे.
२१ डिसेंबर, सकाळी ७ वाजता श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी होईल.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.