संग्रहित छायाचित्र
दूषित पाण्यामुळे मुळा नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. याची गंभीर दखल घेत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील त्रुटी त्वरित दुरुस्त करा, अशा सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने एमआयडीसीला दिल्या असून, एमआयडीसीला नोटीसदेखील बजावली आहे. यावर त्वरित कार्यवाही करण्याचेही नमूद केले आहे. त्यामुळे आता एमआयडीसी कोणते पाऊल उचलणार हे पाहावे लागणार आहे.
मुळा नदी प्रदूषित होत असल्यामुळे नदीतील मासे मृत पडण्याच्या घटना यापूर्वी घडली आहे. त्या बाबत तक्रारी आल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. पाण्याचे नमुने घेतले होते. या वेळी एमआयडीसीने उभारलेल्या सांडपाणी प्रकल्पाची पाहणी केली. तेव्हा त्यामध्ये काही गंभीर त्रुटी आढळल्या होत्या. नियमांचे देखील उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन चार मेगा लिटर असताना प्रत्यक्षात तिथे प्रतिदिन १.५ मेगालिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात असल्याचे आढळून आले. अपुऱ्या सुविधा असल्याने हा प्रकल्प कमी क्षमतेने सुरू आहे, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात काही यंत्रणा बंद अवस्थेतही आहेत. साठवण टाक्या योग्य स्थितीत नसल्याने सांडपाण्याची दुर्गंधी पसरत आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण यंत्रणा नाही. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर केला जात नाही. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून दररोज प्रक्रिया केलेल्या पाण्याचे केवळ ८ ते १० टँकर बाहेर पाठविले जातात. इतर सर्व अर्धवट प्रक्रिया केलेले पाणी थेट मुळा नदीत सोडले जाते. प्रकल्पाच्या बाहेरील सांडपाणी वाहिन्या फुटलेल्या अवस्थेत आहेत, असे नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे. संबंधित नोटिसला दोन आठवड्यात उत्तर द्यायचे आहे.
... या आहेत त्रुटी
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात काही यंत्रणा बंद अवस्थेत
साठवण टाक्या योग्य स्थितीत नसल्याने सांडपाण्याची दुर्गंधी
प्रकल्पाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण यंत्रणेचा अभाव
प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर नाही
केवळ ८ ते १० टँकर बाहेर; उर्वरित सर्व अर्धवट प्रक्रिया केलेले पाणी थेट मुळा नदीत
प्रकल्पाच्या बाहेरील सांडपाणी वाहिन्या फुटलेल्या
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात काही त्रुटी आढळल्या आहेत. त्या त्रुटी दुरुस्ती करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यासाठी नोटीस पाठविण्यात आली आहे. दूषित पाण्यामुळे नदी प्रदूषण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- बी. एम. कुकडे, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.