शहरात महायुती कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष
विधानसभा निवडणुकीचा कल लक्षात आल्यानंतर महायुती उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी दुपारी बारा वाजल्यापासूनच जल्लोष सुरू केला तो रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. शहरातील महायुतीचे तिन्ही उमेदवार विजयी झाल्यानंतर चौका-चौकात आतषबाजी केली. फुलाची, गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण करत जल्लोष केला. महायुतीमधील राष्ट्रवादी (अजित पवार गट) या गटाने पिंपरीत आनंदोत्सव साजरा करत सुरुवात केली. त्यानंतर भोसरी आणि नवी सांगवीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते रस्त्यावर एकत्र आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत मिरवणूक, डिजे लावून आपल्या उमेदवाराचा विजय उत्सव साजरा होत होता.
शहरातील चिंचवड आणि भोसरी या दोन मतदारसंघात भाजपने उमेदवार दिला होता तर, पिंपरी या राखीव मतदारसंघात अजित पवार गटाचे उमेदवार आपले नशीब आजमावत होते. दरम्यान, शहरातील या तिन्ही ठिकाणी महायुतीचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाल्यानंतर नेमका कल कुठे लागेल याची शाश्वती नसल्याने शहरातील सर्वच पक्ष कार्यालयामध्ये शुकशुकाट होता. या ठिकाणी केवळ पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवारांच्या घरासमोर देखील कार्यकर्ते नव्हते. पिंपरीतील सुलक्षणा धर शीलवंत यांच्या घरासमोर मोजके कार्यकर्ते होते. कार्यकर्त्यांसाठी पाण्याच्या बाटल्या तसेच, जेवणाचे पाकीट मागवण्यात आले होते. त्याचप्रमाणे चिंचवड येथील राहुल कलाटे यांच्या घरासमोर देखील शुकशुकाट होता.
दरम्यान, महायुतीचे उमेदवारामध्ये देखील मोठ्या प्रमाणात धाकधूक होती. त्यामुळे सांगवी परिसरातील शंकर जगताप यांचे कार्यालय, महेश लांडगे यांचे कार्यालय तसेच, पिंपरीतील भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर देखील कार्यकर्ते नव्हते. या ठिकाणी केवळ पोलीस बंदोबस्त तैनात असल्याचे दिसून येत होते. मात्र, दुपारी पावणे बाराच्या सुमारास निकालाचा कल लक्षात घेता, पिंपरीतील उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष सुरू केला. संत तुकारामनगर या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आतषबाजी आणि नागरिकांना पेढे वाटून विजय साजरा केला. यानंतर घोषणा देऊन गुलाल उधळण्यात आला. दुसरीकडे, विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे दिसून आल्यानंतर चिंचवडमधील उमेदवार शंकर जगताप यांच्या कार्यालयासमोर तसेच माजी आमदार अश्विनी जगताप यांच्या कार्यालयासमोरही कार्यकर्त्यांनी गर्दी केली.
सांगवीमध्ये चौका-चौकामध्ये स्पीकर लावण्यात आले होते. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वत्र फ्लेक्स लावण्यात आले. कार्यकर्त्यांनी गुलाल, भंडारा उधळण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे जेसीबीच्या पुढील भागामध्ये फुले ठेवण्यात आली. वाजंत्री, ढोल ताशापथकाला देखील पाचारण करण्यात आले. त्यानंतर पिंपरीतील भाजपच्या मुख्य कार्यालयासमोर आतषबाजी करण्यात आली. पिंपरी परिसरातील चिंचवड स्टेशन आणि बाजारपेठेत देखील मोठ्या प्रमाणात गुलाल आणि फुले उधळण्यात आली. पिंपरी, चिंचवड स्टेशन, दापोडी या परिसरामध्ये फ्लेक्स देखील उभारण्यात आले होते.
चिंचवड येथील मतमोजणी थेरगाव या ठिकाणी तर, भोसरी आणि पिंपरी या ठिकाणची मतमोजणी बालेवाडी या ठिकाणी झाली. दरम्यान, पहिल्या दोन ते तीन टप्प्यानंतर निकालाचा कल लक्षात आल्यानंतर मतमोजणी केंद्राबाहेरच कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. या ठिकाणी वरूनच सर्वत्र संपर्क साधून मिरवणुकीची तयारी सुरू झाली. काही वेळातच उमेदवार दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून पुन्हा जल्लोष केला.
विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता सर्वांनाच होती. त्यामुळे अगदी टपरी, केशव कर्तनालय, ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा ते महाविद्यालयात तरुणांमध्ये देखील निकालाची चर्चा दिवसभर रंगली होती. फटाके आणि रॅलीची सुरुवात झाल्यानंतर या चर्चेमध्ये अधिक रंगत आली. आपापल्या मोबाईलच्या माध्यमातून तर, हॉटेलमध्ये छोट्या टीव्हीच्या माध्यमातून निकालाची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती.
कही खुशी कभी गम
शहरातील महायुतीच्या उमेदवारचे घर, कार्यालय एवढेच नव्हे तर, त्या परिसरात असलेल्या सार्वजनिक मंडळांनी देखील मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव साजरा केला. मात्र, दुसरीकडे महाविकास उमेदवारांच्या घराजवळ कमालीची शांतता दिसून आली. सकाळी अगदी थोडा प्रमाणात असलेली कार्यकर्ते देखील दुपारनंतर निघून गेले. तर, त्यांच्या कार्यालयाजवळ देखील कोणीही फिरकले नाही. दुसरीकडे, भोसरी येथील महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या
विजयी उमेदवारांनी घेतले मोरया गोसावींचे दर्शन
चिंचवड येथील उमेदवार शंकर जगताप यांनी निकाल लागल्यानंतर चिंचवड येथील श्री मोरया गोसावी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. चिंचवड परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात साथ दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी तसेच, मंदिरात दर्शन घेऊन ते पुढे मार्गस्थ झाले. यावेळी चिंचवड परिसरातील भाजप, राष्ट्रवादी या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून तसेच भंडारा उधळून त्यांचे स्वागत केले.