संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरातील १० सार्वजनिक जलतरण तलाव ठेकेदारांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. पुढील तीन वर्षे हे तलाव संबंधित ठेकेदार चालवणार आहे. तिकीट विक्री, स्वच्छता, सुरक्षा, पाणी शुद्धीकरण आदी सर्व कामकाज ते पाहणार आहे. परिणामी, महापालिकेच्या कोट्यवधी रूपये खर्चाची बचत होणार आहे, असा दावा महापालिकेच्या अधिकार्यांनी केला आहे.
महापालिकेने शहरातील दहा जलतरण तलाव चालवण्यास देण्यासाठी दोन ते तीन वेळा निविदा प्रसिद्ध केली होती. मात्र, अटी व शर्तीमुळे त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे निविदा रद्द करण्याची वेळ क्रीडा विभागावर आली होती. अखेर, अटी व शर्तीत बदल करून नव्याने निविदा १३ ऑगस्ट २०२४ ला प्रसिद्ध केली होती. त्याला ठेकेदारांचा प्रतिसाद मिळाला. त्यातील अधिक उत्पन्न देणार्या ठेकेदारांना तलाव चालवण्यासाठी देण्यास स्थायी समितीची मान्यता आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि.१०) दिली आहे. यामुळे महापालिकेचा जलतरण तलावावर होणाऱ्या कोट्यवधींच्या खर्चात बचत होणार आहे.
पाणी शुद्धीकरण, सुरक्षारक्षक, जीवरक्षक, कर्मचारी, क्रीडापर्यवेक्षक तसेच, दुरूस्ती काम, सुशोभीकरण, वीज बिल, पाणीपट्टी व इतर खर्च वाचणार आहे. ठेकेदारांकडून महापालिकेस एका तलावासाठी तीन वर्षांकरीता एकूण २८ लाख ६५ हजार ६०० रूपयांचे उत्पन्न मिळणार आहे. थेरगाव तलावासाठी १८ लाख ७२ हजार आणि नेहरू नगर तलावासाठी २७ लाख रूपये महापालिका तिजोरीत जमा होणार आहेत. दरम्यान, कसबा पेठ येथील एचटूओ टेक्रो या ठेकेदाराला संभाजीनगर, वडमुखवाडी, यमुनानगर आणि पिंपळे गुरव हे चार तलाव देण्यात आले आहेत. तर, कसबा पेठेतील अवधूत फडतरे या ठेकेदाराला भोसरी, पिंपरी गाव, सांगवी आणि कासारवाडी हे चार तलाव चालविण्यास मान्यता दिली आहे. शुक्रवार पेठेतील एचटूओ अॅक्वा फन अनलिमिटेड पुल्सला नेहरूनगरचा आणि खडकवासला येथील हर्षवर्धन डेव्हलपर्सला थेरगाव तलाव देण्यात आला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.