संग्रहित छायाचित्र
चिखली, कुदळवाडी येथील आगीच्या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण झाले आहे. चिखली परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे रहिवासी क्षेत्र बनले असून त्याठिकाणच्या प्रत्येक दुकानाचे स्थलांतर करावे. त्यामुळे परिसरातून भंगार गोदामे हटवावीत, अशी मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे संचालक भरत नरवडे यांनी केली आहे.
चिखलीमधील कुदळवाडी येथे सोमवारी (दि.९) भंगाराच्या गोदामांना आग लागली. या आगीत सुमारे १०० गोदामे जळून खाक झाली. यामध्ये कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यासोबत हवेचे प्रदूषण देखील झाले. इथल्या स्थानिक नागरिकांना कायम जीव मुठीत घेऊन वास्तव्य करावे लागते. कुदळवाडीतील आगीची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन विभागाला मदत करण्यासाठी त्यांनी खासगी टँकर पाठवण्याची व्यवस्था केली. तसेच स्थानिक रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास मदत केली
कुदळवाडी, चिखली परिसर हे रहिवासी क्षेत्र बनले आहे. या परिसरात मोठ्या सोसायट्या आहेत. लाखो मजूर येथे राहतात. काही भंगार विक्रेते आजही येथे आपला व्यवसाय करत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने ही भंगार गोदाम तातडीने कुदळवाडी परिसरातून स्थलांतरित करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.