गेल्या दोन दिवसांपासून पिंपरी न्यायालय परिसरात नोटरी वकिलांवरती महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई सुरू होती. दरम्यान, या कारवाईचा विरोध दर्शवत पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीने कारवाई थांबवण्याची मागणी केली. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे आलेल्या महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची याबाबत भेट घेऊन त्याबाबत आदेश देण्याची मागणी केली.
पिंपरी न्यायालय परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून वकील या ठिकाणी नोटरी व्यवसाय करतात. गेल्या दोन दिवसांपासून पिंपरी न्यायालयाच्या आवारात नोटरी वकिलांवर होत असलेल्या अतिक्रमण कारवाईसंदर्भात असोसिएशनने कारवाई तत्काळ थांबवण्यासाठी विनंती केली.
बार असोसिएशनच्या मागणीला मान देत नोटरी वकिलांची इतर ठिकाणी बसण्याची सोय करेपर्यंत कारवाई न करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आयुक्तांनी तत्काळ सूचना केल्या. तसेच कारवाई स्थगित करण्याचे आदेश दिले. यावेळी पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनची संपूर्ण नवनिर्वाचित कार्यकारिणी उपस्थित होती.
दरम्यान, बार असोसिएशनच्या माध्यमातून आयुक्तांना वकिलांच्या समस्याही मांडल्या. या ठिकाणी नोटरी वकील गेल्या अनेक वर्षांपासून बसत आहेत. याबाबत येत्या आठवडाभरात स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असून, त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही असोसिएशनने सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.