संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे बारा जलतरण तलाव खासगी पद्धतीने चालवण्यासाठी निविदा प्रक्रिया करण्यात आली होती. त्यामध्ये ठराविक लोकांना जलतरण तलावाचा ठेका मिळेल, अशा पद्धतीने नियमावली करून दोनच संस्थांना एकाच दराने आठ जलतरण तलाव चालवण्यासाठी मान्यता देण्यात आली. त्यामुळे फेरनिविदा काढून योग्य व सक्षम संस्थांकडे हे काम द्यावे, अशी मागणी माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कामाची निविदा झाली त्यावेळी सहायक आयुक्त पंकज पाटील यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळू नये व योग्य ती सुरक्षितता बाळगावी यासाठी निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा आग्रह त्यांच्याकडे धरला होता. मात्र, निविदा प्रक्रिया खुली झाल्यानंतर संबंधित विभागाने हेतुपुरस्सर दोन संस्थांनाच याचा लाभ मिळेल, या हेतूने निविदा तयार केलेली दिसून येते. परंतु, अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या जिवाशी खेळ होणार नाही अशी प्रक्रिया जलतरण तलावासारख्या ठिकाणी होणे अपेक्षित आहे. तलावावरील कर्मचाऱ्यांचे अनुभवाचे दाखले, जीवरक्षकांचे दाखले खरे असल्याची पडताळणी केली आहे की नाही? याप्रकरणी संस्थांना काम दिल्यास आणि त्यांच्याकडून नागरिकांच्या जीवास धोका झाल्यास त्याची जबाबदारी आयुक्त व क्रिडा विभाग सहायक आयुक्त म्हणून आपली राहील, याची दक्षता आपण घ्यावी. फेरनिविदा काढून योग्य व सक्षम संस्थांना सामावून घ्यावे,असे शितोळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.