संग्रहित छायाचित्र
(विकास शिंदे)
पिंपरी-चिंचवड: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) अवतीभवती ठेकेदार, मलिदा गँग कायम असते. त्यांना सामान्य लोकांपर्यंत पोहचू दिले जात नव्हते. ठराविक लोकांकडे ते जात होते. आता ही मलिदा गँग भाजपबरोबर गेल्यानंतर प्रामाणिक कार्यकर्ते आमच्याकडे राहिले असून अजित पवारांची व्होट बँक कमी झाली असल्याची टीका आमदार रोहीत पवार (Rohit Pawar) यांनी केली.
आमदार रोहित पवार हे बुधवारी पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) दौऱ्यावर होते. पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे, प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत आदी उपस्थित होते.
रोहित पवार म्हणाले की, भाजपबरोबर गेल्याने अजित दादांची व्होट बँक कमी झाली आहे. त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांना पाडण्याची घोषणा केली, तेच लोकसभेला चारच जागा लढणार अशी चर्चा सुरु आहे. त्यांच्यात प्रफुल पटेल हेच हुशार आहे, असे वाटते. त्यांची चार वर्षे बाकी असतानादेखील त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. बाकी नऊ जणांना काहीच मिळाले नाही. लोकांची घरे फोडण्यात आणि राजकारण करण्यात गृहमंत्री फडणवीस अडकले आहे. त्यामुळे त्यांना खात्यांवर लक्ष देण्यात वेळ नाही. निवडणुकीपूर्वी आणखी दहा ते पंधरा जण त्यांच्यावरील दबावामुळे भाजपमध्ये सामील होतील. कायदा-सुव्यवस्था खाते सध्या फेल झाले आहे. अनिल तटकरे आणि सुनील तटकरे यांचा वाद आजचा नाही. ते आमच्या संपर्कात होते. आजही आहेत. पण त्यांना अजून कोणतेही पद दिले नाही. त्यांना कोणते पद द्यायचे ते जयंत पाटील ठरवतील. शरद पवार यांच्या पक्षाच्या शहराध्यक्षांच्या आरोपावर सत्तेतील उपमुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावे लागते. यातच आमची ताकद कळत आहे. शहरात शरद पवार, राष्ट्रवादीवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत. अजित पवार यांच्या अवतीभवती ठेकेदार, मलिदा गँग होती आणि आजही आहे. असेही रोहीत पवार यांनी म्हटले आहे.
प्रगती शरद पवारांमुळेच..
अजित पवार यांना ज्या पद्धतीने पदोन्नती मिळत गेली. त्याला आम्ही कुटुंब म्हणून बघितले आहे. ते म्हणतात रोहित पवारांची राजकीय प्रगती ही शरद पवारांमुळेच झाली आहे. मात्र, अजित पवारांची प्रगती कोणामुळे झाली. तेही पहावे लागेल. अजित पवारांनी जो निर्णय सत्तेसाठी किंवा आपल्यावर होणारी कारवाई थांबावी यासाठी घेतला असेल तर आम्हाला कुटुंब म्हणून आवडला नाही, तर लोकांना कसा आवडेल.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.