भोसरीतील सेक्टर १२ मधील समस्यांचे होणार निराकरण

पीएमआरडीएतर्फे उभारण्यात आलेल्या भोसरी सेक्टर १२ येथील गृह प्रकल्पातील रहिवाशांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याबाबत तक्रारी आहेत. त्यासाठी लवकरच एक समिती गठीत करून बैठक बोलावली जाईल. तक्रारी सोडवण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 24 Jul 2024
  • 04:37 pm
Bhosari Sector 12, PMRDA, Yogesh Mhase

संग्रहित छायाचित्र

रहिवाशांच्या तक्रारीसाठी समिती करणार पाहणी, पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे यांनी केल्या सूचना

पीएमआरडीएतर्फे उभारण्यात आलेल्या भोसरी सेक्टर १२ येथील गृह प्रकल्पातील रहिवाशांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याबाबत तक्रारी आहेत. त्यासाठी लवकरच एक समिती गठीत करून बैठक बोलावली जाईल. तक्रारी सोडवण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. पाहणी करून येत्या काही दिवसांतच त्या समस्या दूर करण्यात येतील, असे पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे यांनी स्पष्ट केले. सेक्टर १२ येथे नव्याने विकसित करण्यात येत असलेला सुमारे सहा हजार घरांचा प्रकल्प मुदतीत मार्गी लावला जाईल, असेही म्हसे यांनी सांगितले.

सेक्टर १२ येथील पहिल्या टप्प्यातील सदनिका उभारून पूर्ण झालेल्या आहेत. वर्षभरापूर्वी या ठिकाणी नागरिक राहायला देखील आले. मात्र, राहिल्यानंतर अगदी दोन महिन्यांपासूनच विविध समस्यांना सामोरे जावे लागले. एका इमारतीतील जवळपास दहा ते बारा सदनिकांमध्ये गळती असल्याचे दिसून आले. त्यामुळे अगदी नवे कोरे संडास बाथरूम फोडावे लागले. गेल्या वर्षभरात जवळपास ७० ते ८० संडास बाथरूम फोडले आहेत. यामुळे त्रासलेल्या रहिवाशांनी पीएमआरडीए प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला. दरम्यान, पीएमआरडीए तत्कालीन आयुक्त राहुल महिवाल यांनी सेक्टर १२ येथील पाहणी करून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते. अपुरा पाणीपुरवठा, सदनिकांच्या आत होणारी गळती, निकृष्ट बांधकाम आणि नियोजन नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. मात्र त्यानंतर त्यापैकी एकाही बाबीवर कार्यवाही न झाल्याने रहिवाशांनी संतापाने पीएमआरडीए कार्यालयावर मोर्चा काढला होता. केवळ एक दोन नावे तर चार वेळा स्थानिक नागरिक कार्यालयावर धडकले होते. मात्र त्यावेळी केवळ आश्वासन देऊन परत पाठवण्यात येत होते. त्यामुळे नागरिकांची कोणतीही कामे होत नसल्याची ओरड आहे.

याबाबत आयुक्त म्हसे यांनी स्पष्ट केले की, नागरिकांच्या तक्रारीचे निश्चित निरसन केले जाईल. त्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात आली आहे. ती याची पाहणी करेल. त्यासाठी बैठकी घेण्यात येणार आहेत. नागरिकांना कोणत्याही कामासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही. अधिकारी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करतील. त्यामुळे रहिवाशांच्या तक्रारी तिथल्या तिथे सोडवल्या जातील.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story