संग्रहित छायाचित्र
विकास शिंदे
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अंगाची लाही होऊ लागल्याने शहरातील नागरिकांची पावले आपसूकच जलतरण तलावाकडे जात आहेत, पण महापालिकेचे विविध भागांतील १३ जलतरण तलावांपैकी आठच तलाव सुरू आहेत. तर, पाच तलाव अद्यापही बंद आहेत. त्यामुळे नागरिकांसह महिला, लहान मुलांचा हिरमोड होत आहे. जलतरण तलाव बंद राहिल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने केशवनगर, संभाजीनगर, कासारवाडी, पिंपरी वाघेरे, यमुनानगर, पिंपळेगुरव, नेहरुनगर, वडमुखवाडी, भोसरी, मोहननगर, थेरगाव, सांगवी, आकुर्डी या भागांत १३ जलतरण तलावांची उभारणी करण्यात आली आहे. मार्च महिना सुरू झाला असताना वातावरणातील तापमानही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असून, पोहण्यासाठी जलतरण तलावांवर गर्दी होऊ लागली आहे. महापालिकेच्या जलतरण तलावावर एक तास पोहण्यासाठी वीस रुपये शुल्क आकारण्यात येते. तसेच मासिक पास ५०० रुपये, तिमाहीसाठी १२०० तर वार्षिक ४५०० रुपयापर्यंतचे पास देण्यात येतात. त्यामुळे पालिकेच्या तलावावर उन्हाळ्यात प्रचंड मोठी गर्दी असते. मात्र, महापालिकेने योग्य नियोजन न केल्यामुळे उन्हाळा सुरू झाला असतानाही पाच तलाव अद्याप कुलूपबंद आहेत.
थेरगाव, मोहननगर, यमुनानगर, निगडी आणि भोसरी येथील जलतरण तलावाची कामे सुरू आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना, खेळाडूंना खासगी जलतरण तलावावर जास्त पैसे मोजून पोहण्यासाठी जावे लागत आहे. दरम्यान, महापालिकेच्या तलावावर पोहण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करण्यात येत आहे. महापालिकेच्या क्रीडा विभागाने मासिक पासही ऑनलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
नेहरुनगर मधील कै. अण्णासाहेब मगर, पिंपळेगुरव येथील कै. काळूराम जगताप, पिंपरी वाघेरे, कासारवाडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वडमुखवाडीतील श्री संत ज्ञानेश्वर, केशवनगर येथील कै. वस्ताद बाळासाहेब गावडे, सांगवीतील बाळासाहेब शितोळे आणि संभाजीनगर येथील साई हे आठ तलाव सुरू आहेत, तर थेरगावातील खिंवसरा पाटील, मोहननगर येथील राजश्री शाहू महाराज, यमुनानगर येथील मीनाताई ठाकरे, प्राधिकरणातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज आणि भोसरीतील कै. बाळासाहेब लांडगे हे पाच तलाव बंद आहेत.
स्थापत्यविषयक कामामुळे दोन तलाव बंद आहेत. एक तलाव आठ दिवसांत सुरू होईल. तर, दोन तलावांच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध करून कामाचा आदेश देण्यात येणार आहे.
- मिनीनाथ दंडवते उपायुक्त, क्रीडा विभाग, महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.