संग्रहित छायाचित्र
पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्या मुलांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे नोकरी मिळावी, यासाठी स्वत: पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पुढाकार घेतला आहे. पोलीस आयुक्तालय हद्दीतील एमआयडीसीतील कंपन्या आणि आयटी कंपन्यांच्या प्रतिनिधींशी बोलून पोलीस आयुक्तांनी एका रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यासाठी एक अर्ज तयार करून त्यावर नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या पोलिसांच्या मुलांची सर्व माहिती भरून घेण्यात आली आहे. या सर्व मुलांचे शैक्षणिक बायोडेटा कंपन्यांकडे जाणार असून त्यानंतर कंपन्यांकडून त्यांना मुलाखतीसाठी बोलविले जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात चार हजारापेक्षा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत. यातील अनेकांच्या मुलांचे विविध माध्यमातून शिक्षण पूर्ण झाले आहे. यातील बहुतांश मुले सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, अनेकांना अद्यापही नोकरीची चांगली संधी मिळत नाही. मुलांना चांगली नोकरी मिळावी, यासाठी काही पोलीस आपल्या वरिष्ठांकडे विनंती करत आहेत.
तुमच्या ओळखीत कुठे नोकरी मिळते का पाहा, अशी विनवणी करत आहेत. ही गोष्ट समोर येताच पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पोलिसांच्या मुलांच्या नोकरीसाठी काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे सांगतिले. तसेच आपल्या इतर अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर एमआयडीसी आणि आयटी कंपन्यांशी संपर्क करून त्यांना पोलिसांच्या मुलांच्या नोकरीबाबतची समस्या सांगितली. मुलांच्या शिक्षणाप्रमाणे आणि अनुभवाप्रमाणे नोकरी उपलब्ध करून द्या, अशी विनंती केली.
पोलीस आयुक्तांच्या या प्रस्तावाला सर्वच कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
अनेक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मुलांचे चांगले शिक्षण होऊनही त्यांना नोकरी मिळत नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे ज्या पोलिसांच्या मुलांचे शिक्षण पूर्ण झाले आहे, नोकरी करायची आहे, त्यांच्यासाठी नोकरी मिळण्याची एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील एमआयडीसी आणि आयटी कंपन्यांशी संपर्क करून एका रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये केवळ पोलिसांच्या मुलांच्या मुलाखती होऊन त्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. - विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त
मुलांची माहिती संकलित करण्यास सुरुवात...
ज्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मुलांना नोकरी करायची आहे, अशा मुलांची माहिती संकलित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालय स्तरावर मुलांच्या शैक्षणिक बायोडेटाचा एक अर्ज तयार करण्यात आला असून तो भरून घेण्याचे काम सध्या सुरू आहे. येत्या १४ डिसेंबरपर्यंत हा अर्ज मुलांना भरता येणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.