संग्रहित छायाचित्र
विधानसभा निवडणुका कामकाज पार पडल्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) अनअधिकृत होर्डिंगवर कारवाईने वेग घेतला आहे. हिंजवडी (ता. मुळशी) येथील होर्डिंग काढून पीएमआरडीएच्या पथकाकडून जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, या परिसरात आणखी कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
निवडणुकीच्या कामकाजामुळे या विभागातील अधिकाऱ्यांना विविध ठिकाणी इलेक्शन ड्यूटी असल्याने कामकाज रखडले होते. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून कारवाई होत नसल्याने पीएआरडीएच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे होत आहेत. तसेच, बेकायदा होर्डिंगची संख्यादेखील वाढत असल्याचे दिग्दर्शनास आले आहे. दरम्यान, या कारवाईत साधारणपणे ४० बाय २० चौरस फुटाच्या अनधिकृत होर्डिंग क्रेन, गॅस कटर आणि मनुष्यबळाच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. त्यावेळी उपस्थित पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागातील अधिकाऱ्यांनी या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करू नये, असे आवाहन केले. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलीस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील सर्व अनधिकृत होर्डिंगसह अनधिकृत बांधकामांचा सर्व्हे सुरू असून अशा अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई चालू राहणार आहे. तरी कारवाई टाळण्यासाठी मुदतपूर्वी अनधिकृत बांधकाम काढून घ्यावे.
- डॉ. दीप्ती सूर्यवंशी, सह आयुक्त, पीएमआरडीए
बांधकामाबरोबरच हॉटेल्सवर व्हावी कारवाई
अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग ॲक्शन मोडवर या मथळ्याखाली सीविक मिरर माध्यमातून वृत्त दिले होते. त्यात कारवाई अनधिकृत बांधकामाबरोबरच हॉटेल्स आणि होर्डिंग्जवरदेखील कारवाई करण्याचे नमूद केले होते. त्या अनुषंगाने प्राधिकरणाच्या या पथकाने कारवाई सुरू केली आहे. त्याचप्रमाणे बांधकामावरदेखील कारवाई पुढील आठवड्यात होणार आहे.