PMRDA NEWS : खराब रस्त्यासाठी आता धरणार ठेकेदाराला जबाबदार

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विकसित केलेल्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा उत्कृष्ट असावा, यावर भर देण्यात येत आहे. याबाबत कालावधी निश्चित केला असून, या दरम्यान रस्ता खराब झाल्यास तो संबंधित ठेकेदाराने दुरुस्त करून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 6 Dec 2024
  • 05:35 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

दोष दायित्वाचा कालावधी निश्चित, नागरिकांकडून मागविले तक्रार अर्ज, जिल्हाभरात ९२ रस्त्यांची कामे

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विकसित केलेल्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा उत्कृष्ट असावा, यावर भर देण्यात येत आहे. याबाबत कालावधी निश्चित केला असून, या दरम्यान रस्ता खराब झाल्यास तो संबंधित ठेकेदाराने दुरुस्त करून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार. रस्त्याच्या कामासंदर्भात संबंधित ठेकेदारांवर दोष दायित्वाचा कालावधी निश्चित केला असून, दोष आढळून आल्यास त्या संबंधित तातडीने दुरुस्ती संदर्भात मोठ्या प्रमाणात कार्यवाही करण्यात येणार आहे.

याबाबत पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी संबंधित निर्णयाची अंमलबजावणीचे सक्त न‍िर्देश द‍िले आहे. दरम्यान, रस्त्या संदर्भात नागरिकांनी तक्रारी करण्याचे आवाहन केले आहे.

पीएमआरडीएचे कार्यक्षेत्र व्यापक असल्यामुळे सातत्याने विविध विकास कामे सुरू असतात. संबंधित कामे उत्कृष्ट आणि दर्जेदार व्हावी, या उद्देशाने महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी संबंधित विभागांना निर्देश दिले आहेत. यात प्राधिकरणाने विकसित केलेल्या रस्त्याच्या कामाबाबत निर्धारित कालावधीपर्यंत संबंधित ठेकेदारांवर दोष दायित्वाचा कालावधी निश्चित केलेला असतो. याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जबाबदार यंत्रणेस दिले आहेत. 

३ ते ५ वर्षांत  काम करण्याची येते नामुष्की
दोष दायित्वाचा कालावधी रस्त्याच्या कामानुसार ३ ते ५ वर्षाचा आहे. या दरम्यान रस्ता खराब झाल्यास तो संबंधित ठेकेदाराने दुरुस्त करून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. यापूर्वी अनेक रस्त्यावरती पुन्हा पुन्हा कामे करण्याची नामुष्की प्राधिकरणावरती येते. एकदा खर्च केल्यानंतर पुन्हा त्यावरती खर्च करण्यासाठी वेगळा निधी वापरण्यात येतो. मात्र आता इथून पुढे संबंधित ठेकेदाराला जबाबदारी करावी लागणार आहे.

दरम्यान, पीएमआरडीएच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने रस्त्यांची कामे करण्यात आलेली आहे. यात रस्त्यांची सुधारणा, रुंदीकरण, काँक्रिटीकरणाचे समाव‍िष्ट आहे. संबंधित कामे ठेकेदारांच्या माध्यमातून करण्यात आली असून त्यांच्यावर संबंधित कामानुसार दोष दायित्वाचा कालावधी साधारणतः ३ ते ५ वर्षाचा निश्चित केला आहे. या कालावधीत जर रस्ता खराब, नादुरुस्त झाला तर तो संबंधित ठेकेदाराने तातडीने दुरुस्त करून देणे बंधनकारक असणार आहे

दीडशे किलोमीटर रस्त्यांची कामे
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सन २०१९-२० ते २०२३-२४ पर्यंत एकूण १४८ किलोमीटरपेक्षा अधिक रस्त्यांची कामे झाली आहेत. यात मावळ तालुक्यात १४.५३,खेड १५.२४,मुळशी १४, भोर ७.२५, वेल्हे ५.३५, हवेली २६.६,  पुरंदर २२.१, दौंड ७.८५ आण‍ि शिरूर तालुक्यात ३५.५ किलोमीटरची रस्यांची कामे व‍िव‍िध ठेकेदारांच्या माध्यमातून करण्यात आली. त्याचप्रमाणे येत्या चार महिन्यांमध्ये आणखीन काही रस्त्याची कामे होऊ शकतात.

तालुकानिहाय कामांची संख्या
नागरिकांना सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने जिल्हाभरात ९२ रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. यात सर्वाधिक कामे हवेली, पुरंदरसह शिरूर तालुक्यातील आहे. यासह मावळ, खेड आण‍ि वेल्हे तालुक्यातील प्रत्येकी ६, मुळशी ९, भोर ८, हवेली २६, दौंड ५, पुरंदर व शिरूर प्रत्येकी १३ रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. 

पीएमआरडीएच्या माध्यमातून रस्त्यांची कामे करण्यात आलेली आहेत. संबंधित रस्ते दर्जेदार व्हावेत, या उद्देशाने ठेकेदारांवर दोष दायित्वाचा कालावधी निश्चित केला आहे. या दरम्यान रस्ते खराब झाल्यास, संबंधित गाव, भागातील नागरिकांनी याबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे अर्ज करावे. त्याबाबत निश्चित पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- डॉ. योगेश म्हसे, महानगर आयुक्त पीएमआरडीए

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest