संग्रहित छायाचित्र
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पथकाकडून निष्कासनाची कारवाई केली सुरू करण्यात आली असून, यंदा वर्षभरात सुमारे साडेतीनशे बांधकामांचे सर्वेक्षण झाले आहे. आत्तापर्यंत जवळपास ९५ बांधकाम, होर्डिंग हटवण्यात आलेले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मौजे लोणीकंद आणि केसनंद (ता. हवेली) येथील अनधिकृत होर्डिगसह बांधकाम काढून टाकत पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाने ते मंगळवारी जप्त केले.
लोणीकंदमध्ये अनुराधा पब्लीसिटी यांच्या अनधिकृत होर्डिगवर सकाळी निष्कासनाची कारवाई करुन ते जप्त करण्यात आले. यासह केसनंद येथे ऑप्टीमा हाईटस सोसायटीतील जतिन खलसे, पुनम होळे, कुलदीप पाटील, शशद्री गुप्ते, विवेक अंबेकर, अभिजीत संन्याल, विश्वजीत कुंभार, अमिर शिंदे या सदनिकाधारकांनी अनधिकृतपणे केलेले पत्राशेडच्या बांधकामांवर पीएमआरडीएच्या पथकाने निष्कासनाची कारवाई केली. लोणीकंदमधील संबंधित अनधिकृत होर्डिगचे साधारणपणे २० बाय २५ चौ. फुट क्षेत्रावरील अनधिकृत होर्डिग क्रेन, गॅस कटर आणि मनुष्यबळाच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले. त्यावेळी उपस्थित पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागातील अधिकारी यांचेमार्फत सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम करू नये, असे आवाहन करण्यात आले.
जुन महिन्यापर्यंत प्राधिकरणाच्या या पथकाने साडेतीनशे ठिकाणांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्यापैकी ९५ अनधिकृत बांधकामे, धोकादायक होर्डिंग हटवण्यात आले. त्यापैकी २४ होर्डिंग आहेत. दरम्यान, नोटीस देवूनही बांधकाम सुरू ठेवून नियमभंग करणाऱ्या ५ जणांवर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. येथून पुढे अनधिकृत कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे. पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार सचिन मस्के, तहसीलदार राजेंद्र रांजणे, पोलिस निरीक्षक महेशकुमार सरतापे, कनिष्ठ अभियंता, पोलिस कर्मचारी यांनी पार पाडली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील सर्व अनधिकृत होर्डिगसह अनधिकृत बांधकामांचा सर्व्हे सुरु असून अशा अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात येत असल्याचे अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाच्या सह-आयुक्त (प्र) डॉ. दीप्ती सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.