पीएमपीएमएलला मिळणार शहरात तीन जागा

पिंपरी-चिंचवड शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी पीएमपीएमएल साठी आरक्षित जागा आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पीएमपीएमएल प्रशासनाकडून त्या जागेची मागणी होत आहे. त्यावरती निर्णय झाला नव्हता. मात्र आता त्या जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून नगरविकास विभागाच्या बैठकीमध्ये याबाबत चर्चा झाली आहे

संग्रहित छायाचित्र

आगार, पार्किंग आणि ई-बस स्टेशन होणार, गेल्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्यास अखेर यश, जागा ताब्यात देण्याचे नगरविकास विभागाचे आदेश

पिंपरी-चिंचवड शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी पीएमपीएमएल साठी आरक्षित जागा आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पीएमपीएमएल प्रशासनाकडून त्या जागेची मागणी होत आहे. त्यावरती निर्णय झाला नव्हता. मात्र आता त्या जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून नगरविकास विभागाच्या बैठकीमध्ये याबाबत चर्चा झाली आहे. त्यामुळे लवकरच शहरातील भोसरी, रावेत, बाणेर आणि मोशी या जागा मिळू शकतील. दरम्यान, पीएमपी प्रशासनाकडून दुजोरा मिळाला आहे.

पीएमपीएलकडून पीएमआरडीएच्या हद्दीत १२२ मार्गांवर ५०३ बसमार्फत सेवा दिली जाते. पीएमपीएमएलकडून पीएमआरडीएच्या काही जागांचा पार्किंग, डेपोसाठी वापर केला जात आहे. मात्र, बदल्यात पीएमपीएमएलला लाखो रुपयांचे भाडे द्यावे लागत आहे. त्यामुळे पीएमपीएमएलने तीन ठिकाणी जागा देण्याची मागणी पीएमआरडीए प्रशासनाकडे केली आहे. 

यामध्ये मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राजवळील जागा, भोसरी येथील मध्यवर्ती सुविधा केंद्राजवळ तसेच बाणेर येथील जागा कायमस्वरुपी देण्याची मागणी पीएमपीएमएल प्रशासनाने केली होती. पीएमपीएमएलच्या ताफ्यात नव्याने सीएनजी आणि ई-बस दाखल होणार आहेत. त्यांच्या पार्किंगसाठी जागा गरजेच्या आहेत. ई-बसच्या दृष्टीने भोसरी मध्यवर्ती सुविधा केंद्राची जागा महत्त्वाची असून त्या ठिकाणी ६० बसचा ई-डेपो केला जाणार आहे. या शेजारीच महावितरण सबस्टेशन आहे. त्यामुळे ई-बसला त्याचा फायदा होणार आहे. तसेच, मोशी येथील जागा देखील ई- बस डेपोच्या दृष्टीकोनातून महत्वाची आहे. या बरोबच बाणेर येथील जागेचाही उपयोग करता येणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पीएमपीएमएल प्रशासन याबाबत पाठपुरावा करत आहे. मात्र, त्यावर निर्णय झाला नव्हता. मात्र नुकताच नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांसोबत बैठकीमध्ये त्याबाबत सकारात्मक चर्चा झालेली आहे. त्यानुसार जागेचा विषय मार्गी लागणार आहे.

 

बस पार्किंगसाठी आम्‍ही तीन ठिकाणी जागेची मागणी केली आहे. बाणेर, मोशी आणि भोसरी येथील जागेचा समावेश आहे. त्या जागा मिळाल्यास सेवा अधिक चांगल्या प्रकारे देता येतील.

- सतीश गव्‍हाणे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

 

संबंधित जागा या सध्या पीएमआरडीएच्या ताब्यात आहेत. त्याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू होता. नुकतीच नगरविकास विभागाने त्याबाबतची बैठक घेतली. सकारात्मक निर्णय झाला असून, आदेश प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही सुरू करण्यात येईल. त्या जागा ताब्यात आल्यानंतर निश्चितच फायदा होईल.

- डी. एम. तुळपुळे, मुख्य अभियंता, पीएमपीएमएल

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest