संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड: पीएमपीच्या दोन नव्या मार्गांमुळे प्रवाशांच्या मागणीवरून पीएमपीएमएल प्रशासनाच्या वतीने ही सेवा सुरू केली आहे. दरम्यान, ग्रामीण भागाप्रमाणेच शहरातील उपनगरातही प्रवाशांना त्यांचा फायदा होणार आहे. राजगुरुनगर ते पुणे स्टेशन आणि कोथरूड ते आळंदी या दोन मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टळली आहे.
राजगुरुनगर येथून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे. या मार्गावर असणाऱ्या बसची संख्या कमी असल्याने विद्यार्थी, नोकरदार यांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे या मार्गावर स्वतंत्र बस सेवा सुरू करावी अशी मागणी प्रवाशांची होती. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. या वरून पीएमपीएमएल प्रशासनाने बस मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. दोन बस आठ फेऱ्यांमध्ये धावणार आहेत. राजगुरुनगर लॉ कॉलेज येथून सकाळी सात, साडेसात वाजता, दुपारी तीन वाजून २० मिनिटे, आणि चार वाजून १० मिनिटांनी बस सुटणार आहे, तर पुणे स्टेशन येथून सकाळी साडेनऊ वाजता, साडेदहा वाजता आणि सायंकाळी साडेपाच, साडेसहा वाजता ही बस असणार आहे. त्याचप्रमाणे बस क्रमांक २१९ बस कोथरूड ते आळंदी या नव्या मार्गाची सुरुवात करण्यात आली.
यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील विश्रांतवाडी, दिघी, थोरल्या पादुका मंदिर, देहूरोड, आळंदी या टप्प्यातील नागरिकांना या बसचा फायदा होईल. गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गाची मागणी करण्यात आली होती. सकाळी दोन वेगवेगळ्या वेळी ही बस मार्गस्थ होईल. दरम्यान, यामुळे सकाळी पुण्यात जाणारे कामगार, विद्यार्थी आणि वारकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे.
निगडीतील तो मार्ग अखेर बंद
पिंपरी-चिंचवड शहरातील ऐतिहासिक, प्रेक्षणीय आणि धार्मिक स्थळांची सफर नागरिक, पर्यटकांना घडवण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून 'पिंपरी-चिंचवड दर्शन' ही बससेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पर्यटन बससेवेकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. सप्टेंबर महिन्यात केवळ २२ प्रवाशांची नोंद आहे. ही बस देहू, आळंदी आणि प्रतिशिर्डी या मार्गावर धावली. अखेर निगडीवरून सुटणारी बस बंद करण्यात आली आहे. निगडी डेपोवरून ही पर्यटन बस सुरू केली होती. दर शनिवारी आणि रविवारी ही बस देहू, आळंदी आणि प्रतिशिर्डी शिरगाव या ठिकाणी रवाना होत असत. त्यासाठी ३५ प्रवाशांची अपेक्षा होती. मात्र निगडीवरून प्रवाशांचा प्रतिसाद न मिळाल्याने ही बससेवा बंद करण्यात आली आहे.
राजगुरुनगर येथून पुणे स्टेशन मार्गावर बस सुरू करण्याची प्रवाशांची मागणी होती. त्यानुसार हा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दोन बस आठ फेऱ्यांमध्ये धावणार आहेत.
- विजयकुमार मदगे, आगार व्यवस्थापक, भोसरी