औंध जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या जिवाशी खेळ; चुकीच्या गटाचे रक्त दिल्याने दोन रुग्ण 'आयसीयू'मध्ये!

सांगवी येथील औंध जिल्हा रुग्णालयात (Aundh Hospital) परिचारिकेच्या चुकीचा फटका दोन रुग्णांना बसला आहे. प्रकृती नाजूक असल्याने वाॅर्डातील दोन रुग्णांना रक्त चढवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

संग्रहित छायाचित्र

रक्त देताना परिचारिका मोबाईलवर बोलत असल्याने घटना घडल्याचा नातेवाईकांचा आरोप

सांगवी येथील औंध जिल्हा रुग्णालयात (Aundh Hospital) परिचारिकेच्या चुकीचा फटका दोन रुग्णांना बसला आहे. प्रकृती नाजूक असल्याने वाॅर्डातील दोन रुग्णांना रक्त चढवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र, तेथील परिचारिकेच्या चुकीमुळे रक्त गटात बदल होऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांना चुकीच्या गटाचे रक्त देण्यात आले. रक्त देताना परिचारिका मोबाईलवर बोलत असल्याने ही गंभीर घटना घडल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. वेगवेगळ्या गटाचे रक्त दिल्याने दोन्ही रुग्णांची प्रकृती गंभीर झाली असून त्यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) हलवले आहे. 

औंध जिल्हा रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या जिवाशी खेळ होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. डाॅक्टर, परिचारिकेच्या निष्काळजीपणाचा फटका  आता रुग्णांना बसू लागला आहे. एका परिचारिकेच्या चुकीमुळे दोन रुग्णांची प्रकृती गंभीर झाली आहे.

औंध इंदिरा वसाहतीत राहणारे दत्तू सोनाजी सोनवणे यांना गुरुवार (दि. २१ मार्च) रोजी दुपारी ४ वाजता जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. त्यांचे हात-पाय सुजले होतो आणि पोट फुगलेले होते. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना दोन-तीन दिवस ॲडमिट करण्याचा सल्ला दिला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच शनिवारी म्हणजेच (दि. २३ मार्च) रोजी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची रक्त तपासणी केली. दत्तू सोनवणे यांना रक्त चढवण्याची सूचना तेथील परिचारिकेला दिली.

मात्र, संबंधित परिचारिकेने निष्काळजीपणा करत दत्तू सोनवणे यांचा रक्तगट ए  पॉझिटिव्ह  असताना त्यांना बी  पॉझिटिव्ह रक्त दिले. त्यांच्या शेजारील रुग्ण वाकडमधील दगडू कांबळे यांना बी पॉझिटिव्ह रक्तगट असताना ए पॉझिटिव्ह रक्त चढवले. दोन्ही रुग्णांना रक्त चढवीत असताना संबंधित परिचारिका मोबाईलवर बोलत असल्याने हा निष्काळजीपणा झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. परिचारिकेच्या या गंभीर चुकीमुळे दोन्ही रुग्णांची प्रकृती अत्यंत नाजूक असून दोन्ही रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी नातेवाईकांनी सांगितले की, रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे व संबंधित नर्सच्या निष्काळजीपणामुळे दोन्ही रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालय प्रशासन त्या नर्सला पळून लावून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

आमदारांची कारवाईची मागणी

याबाबतची माहिती चिंचवडच्या आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप (MLA Ashwini Laxman Jagtap) यांना समजताच त्यांनी तातडीने  घटनास्थळी जात रुग्णांची व नातेवाईकांची भेट घेतली. रुग्ण आणि नातेवाईकांची विचारपूस करत झालेल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली. नातेवाईकांसमोर डॉक्टरांना बोलावून घेऊन चांगलेच झापले. असे प्रकार होतात कसे, असा प्रश्न विचारत रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा अधिकार कोणी दिला, असे म्हणत संबंधित परिचारिकेवर कडक कारवाई करण्याचे आदेश आमदार जगताप यांनी औंध जिल्हा रुग्णालय प्रशासनाला दिले. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणात आपण व्यक्तिगत लक्ष घालणार असून लवकरात लवकर संबंधित परिचारिकेविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच रुग्णांवर तातडीने उपचार करण्याचे आदेश रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत.

रुग्णालयात उपचार घेणा-या दोन्ही रुग्णांना रक्त तपासून एकाला ‘ए’ पॉझिटिव्ह तर दुसऱ्या रुग्णाला ‘बी’ पॉझिटिव्ह रक्त चढवायचे होते. परिचारिकेने ‘ए’ वाल्याला ‘बी’ आणि ‘बी’ वाल्या रुग्णाला ‘ए’ पॉझिटिव्ह रक्त चढवले. दोन्ही रुग्णांना अतिदक्षता विभागात हलविले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. सदरील प्रकरणी तीन लोकांची कमिटी गठीत केली असून त्यांचा अहवाल उद्या ( मंगळवार दि. २६) आरोग्य उपसंचालकांकडे सादर करण्यात येईल. त्यानंतर दोषी असणा-यांवर कारवाई होईल.

- डॉ. नागनाथ यल्लमपल्ली, जिल्हा शल्यचिकित्सक, औंध जिल्हा रुग्णालय, सांगवी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest