संग्रहित छायाचित्र
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर होणाऱ्या गर्दीचे योग्य नियोजन करावे, पार्किंगच्या सुविधेचा आढावा घ्यावा आणि योग्य व्यवस्था करावी, मतदान केंद्राच्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच मतदारांसाठी त्या ठिकाणी असणाऱ्या मूलभूत सुविधा आदींबाबत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आवश्यक उपाययोजना करावी, असे निर्देश निवडणूक निरीक्षक मनवेशसिंग सिद्धू यांनी दिले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त केलेल्या सेक्टर अधिकारी यांनी योग्य समन्वय ठेवून निवडणूक प्रक्रिया सुरळीत व यशस्वीपणे पार पाडावी, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या. पिंपरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघात नियुक्त करण्यात आलेल्या सेक्टर अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण थेरगाव येथील स्व. शंकर अण्णा स्मृती कामगार भवन येथे पार पडले त्यावेळी ते बोलत होते. चिंचवड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार, निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव, साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, आशा होळकर, सेक्टर अधिकारी समन्वयक अजिंक्य येळे यांच्यासह सेक्टर अधिकारी तसेच समन्वय अधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षणास उपस्थित सेक्टर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांत वातावरणात पाडण्यासाठी पोलीस प्रशासनासोबत योग्य समन्वय ठेवावा अशी सूचना केली. चिंचवड येथील पवना नदीघाट, थेरगाव येथील केजुबाई उद्यान, वाल्हेकरवाडी नदी घाट आणि डांगे चौक या ठिकाणी छटपूजेसाठी उपस्थित असलेल्या नागरिकांना चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप टीमच्या वतीने मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी ‘आम्ही मतदान करणार' अशी शपथ देऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले
आस्था फाऊंडेशनचे अमित यादव, विजय गुप्ता, आकाश मिश्रा, शरद मिश्रा, संजू गुप्ता यांच्यासह स्वीप टीमचे प्रिन्स सिंह, दीपक एन्नावार, मनोज माचरे, गणेश लिंगडे, संजू भाट, अंकुश गायकवाड तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.