हिंजवडीसाठी पर्यायी रस्त्याच्या कामाला गती मिळणार; उद्योगमंत्री सामंत यांनी आढावा बैठकीत केल्या सूचना
पीएमआरडीएच्या माण-म्हाळुंगे टी. पी. स्कीमला लवकरच मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळणार असल्याने हिंजवडीसाठी पर्यायी रस्त्याच्या कामाला गती मिळणार असल्याची ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे वाहतूक कोंडी होणाऱ्या चौकातील टपऱ्या पोलीस विभागाच्या सहकार्याने हटवाव्यात. उद्योगांनी त्यांच्याकडील वाहने रस्त्यावर थांबणार नाहीत याची काळजी घ्यावी. एमआयडीसीने दोन्ही महापालिका तसेच पीएमआरडीएच्या हद्दीतील मोकळ्या जागा शोधून तेथे उद्योगांसाठी येणाऱ्या ट्रक आदी वाहनांचे पार्किंगसाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड येथे उद्योग विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता नितीन वानखडे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता अशोक भालकर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक शैलेंद्र राजपूत, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी अर्चना पाठारे, अधीक्षक अभियंता निलेश मोढवे आदींसह उद्योग संघटना, उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शहरातील एकंदरीत एमआयडीसीतील कारखान्यांचा घातक कचऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एमआयडीसी आणि महापालिका या दोन्ही प्रशासनाकडून या प्रश्नावर तोडगा काढला जात नाही. त्यामुळे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी (२४ डिसेंबर) झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्तांना फोन करून घातक कचऱ्या संदर्भात तोडगा काढावा, अशी सूचना केली. त्यामुळे लवकरच एमआयडीसी आणि महापालिकेकडून घातक कचऱ्याचां प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. या बैठकीत हिंजवडी, पिंपरी-चिंचवड, तळवडे आदी ठिकाणच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हद्दीतील उद्योगांच्या समस्यांचा आढावा सामंत यांनी घेतला.
उद्योजकांना परवडेल असे शुल्क घ्यावे
राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानातील रस्त्यातील खड्डे, दुभाजक, पदपथ आदींची देखभाल- दुरुस्ती तातडीने करण्याच्या दृष्टीने प्रस्तावाचा पाठपुरावा करावा. सुविधांसाठी उद्योगांकडून घेण्यात येणारे सेवा शुल्क उद्योगांना परवडेल अशा पद्धतीने त्यांचेशी समन्वय साधून वाढविण्यात यावे, अशा सूचनाही उदय सामंत यांनी केल्या.
या आहेत मंत्र्यांनी केलेल्या सूचना
- घातक कचरा प्रश्न सोडवावा
- तळेगाव येथील फ्लोरीकल्चर पार्कमधील उद्योगांना वाटप केलेल्या भूखंडांबाबत वस्तुस्थिती तपासून घ्यावी.
- वाटप केलेले विनावापर भूखंड अन्य उद्योगांना देण्याबाबत विचार करण्यात येईल.
- राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानातील टप्पा क्र. तीन येथील पोलिस चौकीसाठी आवश्यक त्या जागेचा ताबा पोलीस विभागास देण्यात येईल.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.