संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पथ विक्रेता समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. शहरातील कष्टकरी वर्ग, पथारी, हातगाडी, टपरीधारकांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही लढत आहे. आपल्या आंदोलनाने हाॅकर्स झोन तयार झाले. विक्रेते फेरीवाल्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. त्यामुळे फेरीवाल्यांच्या हिताचे काम करण्यासाठी आम्हाला विजयी करा, असे आवाहन कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केले.
यावेळी उमेदवार प्रल्हाद रामभाऊ कांबळे, किरण श्रीधर साडेकर, राजू विलास बिराजदार, संगीता दत्तात्रय शेरखाने, किसन रामा भोसले, सलीम बाबालाल डांगे, अलका सुनील रोकडे आदी उपस्थित होते. महानगरपालिका पथविक्रेता समिती निवडणूक २०२४ जाहीर झाली असून रविवारी (दि. २० ऑक्टोबर) सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत आपल्या क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असणाऱ्या नियोजित मनपा शाळांमध्ये मतदान होणार आहे. या निवडणुकीत १५ हजार पेक्षा जास्त मतदारांना आठ जागांसाठी मतदान करता येणार आहे. नखाते म्हणाले की, अनेक दिवसांपासून शहरातील कष्टकरी वर्ग, पथारी, हातगाडी, टपरीधारक यांच्या न्याय्य हक्काची लढाई लढलेली आहे. शहरात हॉकर्स झोन निर्माण केले, तर ६५ ठिकाणी हॉकर झोन प्रस्तावित आहेत. २०१४ नंतर ५९०० विक्रेत्यांना फेरीवाला प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यापुढे मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी सर्व पथारी, हातगाडी, टपरीधारकांनी सर्व उमेदवारांना विजयी करावे, असेही आवाहन नखाते यांनी केले.